लोणावळा-पुणे : कल्याणमधील १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता मान शरमेने खाली घालायला लावणारी अशीच एक घटना पुणे येथे घडली आहे. येथील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलात दारूच्या नशेत ऑनड्यूटी पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. घडलेला प्रकार कुणालाही सांगू नको म्हणत वरुन चॉकलेटचे आमिष ही दाखवले.
चिमुकलीने सदर प्रकार आपल्या आईवडिलांच्या कानावर घातला आणि हा प्रकार बाहेर आला. लोणावळा पोलीस स्थानकात या तळीराम पोलीस शिपायवर तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करत निलंबित करण्यात आले आहे. या नराधमाचे नाव सचिन रास्ते असून तो लोणावळ्याच्या ग्रामीण पोलीस स्थानकातच कार्यरत आहे.
हाती आलेल्या महितीनुसार काल बुधवारी नाताळ सणाची सुट्टी असल्याने लोणावळ्यातील विसापूर किल्ल्यावर लोकांची गर्दी होती. सदर पोलीस शिपाई येथे ड्यूटीवर होता. दुपारी जवळीलच एका हॉटेलात त्याने जेवण केले व त्याचे बिल देण्यासाठी तो काऊंटरनजीक आला. येथेच ती ५ वर्षीय चिमूकली उभी होती . लघु शंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला व येथेच चिमूकलीचा विनयभंग केला. चॉकलेटचे आमिष दाखवत जे घडले ते कुणास सांगू नको असेही सांगितले. या मुलीने रडतच हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईवडिलांनी तत्काळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्थानकात जात सचिन रास्तेची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यास रीतसर अटक केली व निलंबित केले.