सुमारे ७०० पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे
मनाली : हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. यासोबतच बर्फाच्छादित दऱ्या पुन्हा एकदा आपल्या सुंदर नजाऱ्याने पर्यटकांना मोहित करत आहेत. मात्र यावेळी झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसमोर अडचणीही उभ्या केल्या आहेत. सोलंग ते अटल बोगद्यादरम्यान प्रचंड बर्फवृष्टीमुळे सुमारे १००० वाहने अडकून पडली आहेत. बर्फवृष्टीनंतर महामार्गावर अडकलेल्या सुमारे ७०० पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तसेच पोलीस व अग्निशमन दल बचावकार्यात गुंतले आहेत.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हजारो पर्यटक मनालीत पोहोचले आहेत. त्यामुळेच मनालीला जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. बर्फवृष्टी पाहण्यासाठी रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांमध्ये बसलेल्या पर्यटकांनी अनेक तास बर्फवृष्टीचा आनंद लुटला. मोठ्या संख्येने लोक अजूनही मनालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांमध्ये बसून रस्ता उघडण्याची वाट पाहत आहेत.
मनालीमध्ये वाहतूक आणि बचाव कार्यात अडचण निर्माण झाली असतानाच शिमल्यात बर्फवृष्टीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर शहरात जोरदार बर्फवृष्टी झाली, त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक मनालीला पोहोचत आहेत. शिमला आणि मनालीमध्ये झालेल्या या हिमवर्षावामुळे स्थानिक पर्यटन उद्योगाला चालना मिळाली आहे. कोविड-१९ पासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या हॉटेल्स आणि व्यावसायिक संस्थांच्या आशा या हंगामामुळे पल्लवीत झाल्या आहेत.