दिल्ली पोलिसांची धडक कारवाई
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०२५ मध्ये होऊ शकतात. दरम्यान, नायब राज्यपालांच्या आदेशानुसार दिल्ली पोलीस दिल्लीत बनावट मतदार आणि बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यासाठी सातत्याने कारवाई करत आहेत . या संदर्भात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. घुसखोरांची बनावट मतदार कार्ड आणि आधार कार्ड बनवणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील ११ जणांना अटक केली आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बनावट वेबसाइट तयार करणारे, तांत्रिक ज्ञान असलेले लोक आणि आधार कार्ड ऑपरेटर यांचा समावेश आहे. या आरोपींमध्ये ६ बांगलादेशींचा समावेश आहे. हे आरोपी बनावट वेबसाइटच्या माध्यमातून घुसखोरांची बनावट ओळखपत्रे तयार करायचे. या प्रकरणात आतापर्यंत एक हजारहून अधिक घुसखोरांची ओळख पटली आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्ली पोलिसांना अवैध बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी दोन महिन्यांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नायब राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर आता प्रमुख बाजार महासंघ आणि संघटनाही अवैध बांगलादेशी आणि घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी पुढे येत आहेत.
फेस्टा, डीएचएमए, सीटीआय, भारतीय उद्योग व्यापार मंडळ आणि इतर संस्थांचे लोक रिक्षाचालक आणि कचरा वेचणाऱ्यांमध्ये घुसखोर आहेत की नाही याची पडताळणी स्वतः करत आहेत. यानंतर त्यांची माहिती दिल्ली पोलिस आणि एमसीडीला देण्यात येत आहे.