चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था अण्णा विद्यापीठात १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेजच्या बाहेर बिर्याणी विकणाऱ्या व्यक्तीने आपल्या मित्रासह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घुसून या विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य केले. पीडित मुलगी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकारणी विजय थलपती जोसेफ यांनी याप्रकरणी सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
बुधवारी इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थीनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये मित्रासोबत बसली होता. यावेळी विद्यापीठाच्या बाहेर बिर्याणी विकणारा एक व्यक्ती त्याच्या एका मित्रासह तेथे पोहोचला. आरोपींनी विद्यार्थीनीच्या प्रियकराला मारहाण केली. यानंतर विद्यार्थिनीला विद्यापीठाच्या आवारातील झुडपात ओढून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीचा मित्रही विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.
या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील गुन्हे वाढले आहेत, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी ही बाब अत्यंत धक्कादायक असून विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर अत्याचार करणारी व्यक्ती ही सराईत गुन्हेगार असून द्रमुकचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्री स्टॅलिन घेणार का, असा सवालही अण्णामलाई यांनी केला.
विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारानंतर येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘शेम ऑन यू स्टॅलिन’ हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
तामिळनाडूच्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनीवर बलात्काराची ही पहिली घटना नाही. याआधीही तामिळनाडूतील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींवर बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यावर्षी ऑगस्टमध्ये कृष्णागिरी जिल्ह्यात १३ विद्यार्थिनींना बनावट एनसीसी कॅम्पमध्ये बोलावून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. बलात्कार करणाऱ्यांमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाचाही समावेश होता. याप्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली होती. जानेवारी २०२३ मध्ये कांचीपुरममधील एका महाविद्यालयात पाच आरोपींनी चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या प्रकरणातही आधी मुलीच्या मित्राला मारहाण करण्यात आली.