असे केल्याने डेटा आणि कॉलिंग प्लॅनच्या किमती किमान ४५ टक्क्यांनी कमी होतील व यामुळे तब्बल ३० कोटी यूजर्सना दिलासा मिळेल.
नवी दिल्ली : मोबाइल वापरकर्त्यांना दिलासा देणारी एक मोठी बातमी रसंचार क्षेत्रातून समोर आली आहे. भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने (ट्राय) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार आता कॉलिंग आणि एसएमएससाठी वेगळे रिचार्ज प्लॅन उपलब्ध असतील.
भारतातील बहुतांश जनता ही ग्रामीण भागात राहते. येथील ४५ टक्के लोक वगळता इतर लोक फारसे टेक्नोसेव्ही नाहीत. त्यामुळे ते मोबाइल फक्त कॉलिंगसाठीच वापरतात. ही लोकसंख्या ३० कोटींच्या आसपास असावी असा ढोबळ अंदाज ट्रायने वर्तवला आहे. तर फक्त कॉलिंग साठी फोन वापरणाऱ्यांसाठी हे प्लॅन सोईचे ठरतील. यापूर्वी अशा ग्राहकांना डेटा पॅकचे अनावश्यक शुल्क सहन करावे लागत होते. सरकार नवीन मार्गदर्शक तत्त्वांसह ही समस्या सोडवण्याच्या तयारीत आहे.
गेल्या जुलैमध्ये जिओ , एअरटेल आणि वोडाफोन आयडिया (VI) ने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती २५ टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. याचा थेट परिणाम अशा ग्राहकांवर झाला जे केवळ कॉलिंगसाठी फोन वापरतात. उदाहरणार्थ, जिओचा २३९ रुपयांचा प्लान वाढवून २९९ रुपये करण्यात आला. तर एअरटेलचा १७९ रुपयांचा प्लान आता १९९ रुपये आहे. यानंतर ग्राहकांकडून डेटा-कॉलिंग-एसएमएसच्या स्वतंत्र पॅकची मागणी केली. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे ही समस्या दूर होईल.
स्पॅम कॉल आणि मेसेज थांबवण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल ट्रायने जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलसह अनेक कंपन्यांना प्रत्येकी तब्बल १२ कोटींचा दंड ठोठावला आहे . यासह मागील दंडासह एकूण दंड हा आता १४१ कोटी रुपये झाला आहे. कंपन्यांनी अद्याप ही रक्कम जमा केलेली नाही. ट्रायने दूरसंचार विभागाला (DoT) लवकरात लवकर हा दंड वसूल करण्याची विनंती केली आहे.
ट्रायने १ नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू केल्यामुळे दूरसंचार कंपन्या चिंतेत आहेत .या अंतर्गत बँका, ई-कॉमर्स आणि इतर संस्थांनी पाठवलेले व्यवहार आणि सेवा संदेश ट्रेस करणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक असेल. ट्रायच्या नियमांची वेळेवर अंमलबजावणी करण्याच्या कडक सूचना सरकारने दिल्या आहेत. मात्र, टेलिकॉम कंपन्या अजूनही तयारी अपुरी असल्याचा हवाला देत आहेत. दूरसंचार कंपन्यांनी ट्रायकडे दोन महिन्यांचा अतिरिक्त वेळ मागितला आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, नवीन नियमांमुळे ओटीपी आणि इतर मेसेज डिलिव्हर करण्यात अडचणी येऊ शकतात. तथापि, ट्राय या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत आहे आणि सर्व दूरसंचार कंपन्यांनी वेळेत नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.