अस्थाना : कझाकस्तानमधील अकताऊ येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडलेल्या एका भीषण दुर्घटनेत एक प्रवासी विमान कोसळले. या अपघातात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रात्री ९:३० वाजता, अपघातानंतर सुमारे १० तासांनी, कझाकचे उपपंतप्रधान कानाट बोझुम्बेव यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली.
वृत्तानुसार, विमानात ६२ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर्स होते. हे विमान अझरबैजानहून रशियाच्या चेचन्या प्रांताची राजधानी ग्रोझनीकडे निघाले होते, परंतु कझाक शहर अकताऊपासून सुमारे ३ किमी अंतरावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यादरम्यान विमान कोसळले आणि त्याचे दोन तुकडे झाले, त्यानंतर त्याला आग लागली.
दाट धुक्यामुळे उड्डाणाचा मार्ग बदलण्यात आल्याचे स्थानिक एजन्सींचे म्हणणे आहे. अपघात होण्यापूर्वी विमानाने विमानतळावर अनेक फेऱ्या मारल्या होत्या. वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगची परवानगीही मागितली होती. मात्र, नंतर त्याला विमानतळाजवळील समुद्रकिनाऱ्यावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. क्रॅश झालेले विमान अझरबैजान एअरलाइन्सचे एम्ब्रेर १९० मॉडेल होते. कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ५२ बचाव पथके आणि ११ बचाव उपकरणे अपघातस्थळी पाठवण्यात आली आहेत.
अपघात नेमका असा घडला याबाबत स्थानिक तज्ञांमध्ये अनेक मतप्रवाह पहायला मिळाले.
१) पक्ष्यांच्या टक्करीमुळे ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट : मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाचा ऑक्सिजन सिलिंडरवर पक्षी आदळल्यावर त्याचा स्फोट झाला, त्यामुळे विमानाचा अपघात झाला. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फुटेजमध्ये विमानाला अपघात झाल्यानंतरच आग लागल्याचे दिसत आहे. त्यापूर्वी आग किंवा धूर दिसत नाही.
२) तांत्रिक त्रुटी: कझाकस्तानच्या अधिकाऱ्यांनुसार ते काही तांत्रिक त्रुटींच्या कोनातूनही अपघाताचा तपास करत आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणात सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विमानतळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.