आज होणार विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या बालकांचा गौरव
नवी दिल्ली : दिल्लीतील भारत मंडपम येथे आज गुरुवारी वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधानांच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण केले जाईल. यावेळी १४ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील १७ मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये ७ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या १७ मुलांना पुरस्कार देऊन सन्मान करणार आहेत. हे पुरस्कार सात श्रेणींमध्ये दिले जातात. ज्यामध्ये कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा आणि पर्यावरण यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी या कार्यक्रमात उद्घाटनपर भाषण करतील. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते आणि मान्यवरांसह सुमारे ३,५०० मुले या कार्यक्रमात सहभागी होतील.
केंद्र सरकारने १९९६ मध्ये राष्ट्रीय बाल पुरस्कार सुरू केला. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या बालकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल पुरस्कार सुरू केला. १९९६ पासून पुरस्कार मिळालेली ही मुले कर्तव्याच्या वाटेवर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात.
वीर बाल दिन साजरा करण्यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शीख समाजाचे महान नेते गुरु गोविंद सिंग यांचे चार पुत्र - साहिबजादे अजित सिंग, जुझार सिंग, जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना खालसा पंथाचे प्रणेते होते. १६९९ मध्ये, गुरु गोविंद सिंग जी यांनी खालसा पंथाची स्थापना केली, याचा उद्देश धार्मिक छळापासून शीख समुदायाचे संरक्षण करणे हा होता. आजच्याच दिवशी २६ डिसेंबर रोजी मुघल राजवटीत या चार साहिबजाद्यांनी लहान वयातच आपला धर्म आणि श्रद्धा जपण्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकार हा पुरस्कार प्रदान करते.
ज्या मुलांचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त आणि १८ वर्षांपेक्षा कमी आहे. जे भारताचे नागरिक आहेत आणि देशात राहतात. त्यांना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. सन २०१८ मध्ये सार्वजनिक क्षेत्रात शौर्याचे प्रदर्शन घडवलेल्या मुलांचाही समावेश करण्यात आला होता. हा पुरस्कार ७ श्रेणींमध्ये दिला जातो. ज्यामध्ये कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शिक्षण, समाजसेवा आणि खेळ यांचा समावेश होता. आता त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचीही भर पडली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याला पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते. यासोबतच पुरस्कार विजेत्यांना एक लाख रुपयांचे रोख पारितोषिकही दिले जाते.
२०२३ मध्ये, हा पुरस्कार ११ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील ११ मुलांना देण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये शौर्य आणि सामाजिक कार्य गटात एक, नवोपक्रम श्रेणीत दोन, क्रीडा प्रकारात तीन आणि कला आणि संस्कृती गटात चार मुलांचा समावेश होता. या ११ पुरस्कार विजेत्यांपैकी ५ या मुली आणि ६ हे मुलगे होते.