वॉशिंग्टन : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात एका समलिंगी जोडप्याला त्यांनी दत्तक घेतलेल्या २ मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी १०० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सुनावलेल्या शिक्षेत या दोन आरोपींना पॅरोल मिळण्याची तरतूदही रद्द करण्यात आली होती. आरोपींनी अनेक वर्षांपूर्वी ख्रिश्चन स्पेशल नीड एजन्सीमधून दोन मुलांना दत्तक घेतले होते. यातील एकाचे वय सद्यघडीस १० तर दुसऱ्याचे १२ वर्षे आहे.
विल्यम झुलॉक (३४) आणि झॅचरी झुलॉक (३६) हे मुलांवर आटोणात अत्याचार करायचे. या लोकांनी त्यांच्या मित्रांसोबत लहान मुलांवरील लैंगिक शोषणाचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले होते. यातूनच या प्रकरणाला वाचा फुटली होती. आरोपींनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप मान्य केले आहेत.
न्यायालयासमोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, दोघे आरोपी दररोज लहान मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असे. याहून अधिक हिणकस बाब म्हणजे त्यांनी मुलांना आणखी दोन लोकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ बनवून ते चाइल्ड पोर्नोग्राफी रॅकेट चालवणाऱ्या टोळ्यांना विकायचे.
ही बाब दोन वर्षांपूर्वी उघडकीस आली. पोलिसांनी २०२२ मध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी रॅकेट चालवणाऱ्या एका व्यक्तीला या मुलांचे व्हिडिओ डाउनलोड करताना पकडले. यानंतर त्याच्या चौकशीत त्याने पोलिसांना सांगितले की हे दोन आरोपी त्यांच्या घरात राहणाऱ्या मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून विकत होते. यानंतर या दोघांना अटक करण्यात आली.
भारतानेही बालकांचे शोषण केलेल्या साहित्याचा शोध घेणे हा गुन्हा ठरवला आहे
भारतातील आयटी कायदा २०००नुसार, जर एखाद्याने मुलांचा समावेश असलेल्या लैंगिक शोषणाची सामग्री प्रकाशित केली, अपलोड केली किंवा शेअर केली किंवा तसे करण्यात मदत केली तर कलम ६७-बी अंतर्गत ५ वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असाच गुन्हा केल्यास ७ वर्षांचा कारावास आणि १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
कायद्यानुसार, इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये (मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट) मुलांचे शोषण केलेले साहित्य ब्राउझ करणे, डाउनलोड करणे, संग्रहित करणे हा देखील गंभीर गुन्हा मानला जातो. तर सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार मुलांचे शोषण केलेले साहित्य डाउनलोड करणे आणि पाहणे हा पोक्सो आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.