कोटा : राजस्थान मधील कोटा शहरातून मनाला चटका लावणारी एक घटना समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने तीन वर्षे आधी स्वेच्छा निवृत्ती घेतली. आजारी पत्नीची सेवा सुश्रूषा करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले. त्याच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व मित्रपरिवाराने एक फेअरवेल पार्टी आयोजित केली. यादरम्यान त्याच्यासोबत त्याची आजारी पत्नी देखील सोबत होती. यावेळी सदर अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात येत असतानाच अशक्तपणामुळे त्याच्या पत्नीला भोवळ आली व ती पडली. काही वेळाने तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोटाच्या दादाबारी भागात राहणारे देवेंद्र कुमार सेंट्रल वेअरहाऊसमध्ये व्यवस्थापक पदावर होते. त्याने निवृत्तीच्या तीन वर्षे आधी व्हीआरएस घेतले होते. त्याची पत्नी हार्ट पेशंट होती आणि तिची सेवा करण्यासाठी त्याने नियोजित वेळेपूर्वी नोकरी सोडली होती. २४ डिसेंबर हा त्याचा नोकरीचा शेवटचा दिवस होता आणि त्यानिमित्ताने त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी एक छोटी पार्टी आयोजित केली होती.
पार्टीला बरेच लोक आले होते. प्रसन्न वातावरणात मस्ती आणि हशा चालू होता. देवेंद्रचे मित्र त्याच्यासोबत घालवलेला वेळ आठवत होते तर दुसरीकडे नातेवाईक आणि इतर ओळखीचे लोक सतत देवेंद्रला पुष्पहार घालून अभिवादन करत होते. तसेच नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत होते. यावेळी सर्वांच्या सांगण्यावरून देवेंद्रची पत्नी दीपिकानेही देवेंद्रला पुष्पहार घातला. माला घातल्यानंतर तिला थोडी चक्कर आल्यासारखे वाटले आणि ती खाली पडली. ती लगेच बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
अवघ्या ७ महिन्यांपूर्वी कोटा येथे बदली होऊन आलेल्या देवेंद्रला मूलबाळ नव्हते. देवेंद्र ऑफिसला गेल्यावर दीपिका घरी एकटी असायची. तिला हृदयाचा त्रास होता. त्यामुळे देवेंद्रला तिची सतत काळजी वाटत होती. या चिंतेमुळे आणि काळजीपोटी त्याने मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती ज्या आजारी पत्नीची काळजी घेता यावी म्हणून सदर अधिकाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली, तीचा त्याच दिवशी मृत्यू व्हावा.. नियतीचा खेळ देखील अजब आहे. दरम्यान समाज माध्यमावर हा व्हिडिओ दुपारपासूनच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जोरात लाइक आणि शेअर केला जात आहे. व्हिडिओ पोस्टच्या कमेन्टमध्ये लोक हळव्या कमेन्ट करत आहे.