हृदयरोग, रक्तदाब आणि अँटीबायोटिक्स व किडनीशी संबंधित औषधांचा साठा परत मागवण्याचे सीडीएससीओचे आदेश.
डेहराडून : हिमाचल प्रदेशमध्ये उत्पादित २७ औषधे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या मानकांची पूर्तता करत नाहीत. त्यांचे नमुन्यांत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. याबाबत सीडीएससीओने अलर्ट जारी केला असून या उद्योगांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
या औषधांचा देशभरात पुरवठा केला जातो. सॅम्पल फेल झाल्यानंतर औषध नियंत्रकांनी हिमाचलच्या औषध कंपन्यांना देशभरात पाठवण्यात आलेल्या औषधांचा साठा परत मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या चाचण्यांत देशात एकूण १११ औषधांचे नमुने फेल झाले होते. त्यापैकी २७ औषधे हिमाचलमध्ये बनतात.
सीडीएससीओच्या मते, बहुतेक औषधे हृदय, बीपी, अँटीबायोटिक्स, किडनी आणि ऍलर्जी यांसारख्या आजारांशी संबंधित आहेत. यापैकी बहुतेक औषधे बड्डी बरोतीवाला आणि नालागड (बीबीएन) मध्ये बनविली जातात. हिमाचलच्या १६ औषधांचे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत आणि ११ राज्य प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचण्यांत फेल ठरले. बीबीएनमधील एकाच कंपनीचे तीन नमुने फेल झाले आहेत. यावर्षी सदर कंपनीच्या चार औषधांचे नमुने निकामी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्याचे औषध नियंत्रक मनीष कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार , ज्या कंपन्यांच्या औषधांचे नमुने निकामी आढळले आहेत, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. याआधी सर्व औषध कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.