स्मारकाबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू
नवी दिल्ली : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ११:४५ वाजता निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गृह मंत्रालयाने अंत्यसंस्कारासाठी सर्व प्रोटोकॉलची व्यवस्था केली आहे. दरम्यान, स्मारकाबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू आहे. स्मारकासाठी जागा निश्चित न केल्याबद्दल काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचवेळी स्मारक बांधले जाईल, मात्र त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे केंद्राने म्हटले आहे.
आज सकाळी ८ वाजता मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. येथे काँग्रेस नेत्यांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वप्रथम मनमोहन सिंह यांच्या कन्या आणि त्यांच्या पत्नीने पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री ९.५१ वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते आणि बरेच दिवस आजारी होते. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. काँग्रेसनेही ३ जानेवारीपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
निगमबोध घाटाजवळच डॉ.मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. गृहमंत्रालयाने ते मान्यही केले आहे. तथापि, योग्य स्थान मिळवण्यासाठी आणि ट्रस्टचे निर्माण करण्यासाठी काही वेळ लागू शकतो. सरकारने यापूर्वी योग्य ती पावले उचलली नसल्याचा आरोप जयराम रमेश आणि इतर काँग्रेस नेत्यांनी केला आहे. मल्लिकाजुर्न खर्गे यांनीही पत्र लिहून सरकारने स्मारकासाठी जागा देण्याची मागणी केली होती.
डॉ.मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते. ते देशाचे पहिले शीख पंतप्रधान आणि सर्वाधिक काळ हे पद भूषवणारे चौथे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक प्रगतीच्या दिशेने अनेक ऐतिहासिक पावले टाकली. त्यांचा साधा स्वभाव, दूरदृष्टी आणि निष्ठा यासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील.