सासष्टी: घोगळ येथे फ्लॅटला आग, अग्निशामक दलाकडून दोघांना जीवदान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th December 2024, 10:36 am
सासष्टी: घोगळ येथे फ्लॅटला आग, अग्निशामक दलाकडून दोघांना जीवदान

मडगाव :  घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मडगाव अग्निशामक दलाने अडकलेल्या दोघा भावंडांना दरवाजा तोडून सुखरुप बाहेर काढले. यात सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव घोगळ येथील हाऊसिंग बोर्ड येथे दत्तमंदिर नजिकच्या बीआर इन्क्लेव्ह इमारतीतील देशमुख यांच्या फ्लॅटला आग लागण्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी उशिरा ही आग लागली. देशमुख यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेशद्वारावरील वातानुकूलित यंत्रणेला (एसी) आग लागली. यामुळे एसी आगीने जळून वितळला व प्लास्टिक खाली पडून लागले. यावेळी फ्लॅटमध्ये देशमुख यांची दोन मुले मंथन देशमुख (२१) व समिथा देशमुख (१६) ही अडकून पडली. या आगीची माहिती मडगाव अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.




सर्वप्रथम वीजपुरवठा बंद करुन झाल्यावर आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. त्यानंतर दरवाजा फोडून घरात प्रवेश करण्यात आला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. यात घरातील वायरिंगही जळालेले असून फ्लॅटमध्ये आगीमुळे नुकसान झाले.  सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले असले तरी अग्निशामक दलाकडून सुमारे २० लाखांची मालमत्ता वाचवण्यात आली आहे. तसेच दोघा मुलांचा जीव वाचवण्यातही अग्निशामक दलाला यश आले आहे. मडगाव अग्निशामक दलाच्या फायर फायटर अनुष्ठा ताटे, डी. आर. खांडेपारकर, आर. जी. नाईक, आनंद मिशाळ यांनी ही आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले.


हेही वाचा