आतापर्यंत १८१ पैकी १७९ जणांचा मृत्यू. विमानात १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते.
सेऊल : येथे एक प्रवासी विमान रनवेवरून घसरल्याने भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानात १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्ससह एकूण १८१ लोक होते. अपघात होताच बचावकार्य सुरू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परतत होते. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरताना विमान घसरले आणि भिंतीवर आदळले. भिंतीवर आदळताच विमानाने पेट घेतला. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात आतापर्यंत १८१ पैकी १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ३२ फायर इंजिन आणि हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले होते.
प्राथमिक माहितीनुसार, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय अग्निशमन यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर लागलेली आग जवळपास विझवण्यात आली आहे. वृत्त लिहेपर्यंत बचावकार्य सुरूच होते. विमानाच्या ढिगाऱ्यातून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले जात आहे. सध्या बचाव मोहिमेदरम्यान दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. त्यात एक प्रवासी आणि एक विमान चालक आहे.
बातमी अपडेट होत आहे.