लिमा : दक्षिण अमेरिकन देश पेरू सध्या मोठ्या त्सुनामीच्या तडाख्यात सापडला आहे. येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल २९ डिसेंबर रोजी पेरूच्या किनाऱ्यावर १३ फूट उंचीच्या लाटा उसळल्या, त्यामुळे शनिवारी अनेक बंदरे बंद करण्यात आली होती. नॅशनल इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केलेल्या माहितीनुसार पेरूने १ जानेवारीपर्यंत १२१ पैकी ९१ बंदरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेरूच्या सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या राजधानी लिमाजवळील कॅलाओ बंदरातून पर्यटक आणि मासेमारी नौकांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही मानवी नुकसानीचा धोका टाळण्यासाठी देशाच्या मध्य आणि उत्तरेकडील अनेक समुद्रकिनारे बंद करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या वादळामुळे डझनभर मासेमारी नौकांचे नुकसान झाले असून धोकादायक परिस्थितीत चालवता न आलेल्या बोटींचेही नुकसान झाले आहे. पेरुव्हियन नौदलाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन किनारपट्टीवरील समुद्राच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या लाटा तयार झाल्या आहेत. दरम्यान लाटांमुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय इक्वेडोरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आपत्कालीन एजन्सी परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्या तरी, सुरक्षितता लक्षात घेऊन, सर्व बाधित किनारे बंद करण्यात आले आहेत.