सोलापूर :पंढरपुर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तब्बल ३०० किलो फुलांची व सुमारे ५ हजार संत्र्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामुळे विठ्ठल मंदिरात संत्र्याचे वन अवतरल्याचा भास होत आहे. भाविकांनी विठूरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
श्री विठ्ठल गाभारा, श्री रुक्मिणी गाभारा व श्री संत नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, तोरण, कमानी इत्यादींवर ३०० किलो फुलांचा व ५ हजार नग संत्र्यांचा वापर करून मनमोहक व आकर्षक सजावट केली आहे. ही सजावट पुणे येथील विठूभक्त प्रदीपसिंह ठाकूर यांनी केली आहे. यासाठी एकूण २० कामगारांनी परिश्रम घेतले. २०२१ साली ठाकूर परिवाराने मंदिर समितीकडे याबाबत इच्छा व्यक्त केली होती.यानंतर गेल्या चार वर्षांपासून याप्रकारची आरास ठाकूर कुटुंबियांतर्फे केली जाते असे मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
नववर्षानिमित्त भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. लोकांच्या सुविधेच्या अनुषंगाने मंदिर प्रशासनातर्फे अनेक उपाय योजनांची आखणी करण्यात आली आहे. सध्या येथे होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता प्रशासनाने येथे ऑनलाईंन दर्शन पास साठी असणारी बुकिंग व्यवस्था तूर्तास बंद ठेवली आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध घालण्यात आले असून, पूजा आणि इतर धार्मिक अनुष्ठानांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
महत्त्वाचे सण, उत्सव, खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, सजावट केली जाते. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. काही जण नित्यनेमाने दरवर्षी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेत असतात. विठ्ठल नामात तल्लीन भाविकांचा उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा असतो.