कोल्हापूरातील अविश्वसनीय घटना
कोल्हापूर : वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले. अंत्यविधीची तयारी झाली. रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले व त्यांच्यावर पुन्हा उपचार केले.
आणि परवा सोमवारी तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. चर्चेत असणारे ते आजोबा म्हणजे कसबा बावडा परिसरातील पांडुरंग उलपे म्हणजेच पांडुरंग तात्या. आणि त्यांच्यासोबतच चर्चेत आहे रस्त्यावरील तो खड्डा ज्याने तात्यांना जीवनदान दिले. या सगळ्या घटनेची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, १६ डिसेंबर रोजी पांडुरंग तात्या हरिनामाचा जप करत होते. त्यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी त्यांच्या पत्नी तेथे आल्या असता तात्या जमिनीवर घामाघूम स्थितीत जमिनीवर पडलेले आढळले. त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांना बोलावून तात्यांना रुग्णालयात हलवले. १६ डिसेंबर रोजी रात्री साडे अकरांपर्यंत त्यांना वाचवण्याचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. यानंतर त्यांनी तात्यांना मृत घोषित केले. ते वारल्याची बातमी एव्हाना अवघ्या पंचक्रोशीत पोहोचली होती. घरी जमून सर्वांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी हाती घेतली. भावकी, पाहुणे, वारकरी संप्रदायातील त्यांचे सवंगडी पोहोचले.
इकडे तात्यांना घेऊन रुग्णवाहिका त्याच्या घरी निघाली. त्याच्या घराजवळ जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे खूप होते. दरम्यान अशाच एका खड्ड्यात रुग्णवाहिकेचे मागील चाक धडकले आणि चमत्कारच झाला. पांडुरंग तात्यांच्या शरीराची थोडी हालचाल झाली. त्या जोरदार धक्क्याने त्यांचे बंद पडलेले त्यांचे हृदय पुन्हा कार्यान्वित झाले. रुग्णवाहिकेत असलेल्या अटेंडंटनी त्यांना प्राथमिक उपचार दिले व रुग्णवाहिका पुन्हा रुग्णालयाच्या दिशेने वळवण्यात आली. येथे त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले. तासाभरात तात्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. तात्या शुद्धीवर आले. पुन्हा बोलू चालू लागले.
परवा सोमवारी तात्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर तात्या आपल्या पायावर उभे राहून घराकडे चालत आले. ही सगळी पांडुरंगाचीच कृपा असल्याचे त्यांच्या पत्नी भरल्या डोळ्यांनी सांगत आहेत.