कौटुंबिक वादातून खून केल्याची कबुली मुलाने पोलिसांकडे दिली आहे.
लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी (३१ डिसेंबर) रात्री वडिलांनी मुलासह संपूर्ण कुटुंबाची हॉटेलमध्ये हत्या केली. पत्नी आणि चार मुलींची हत्या करून वडील बद्रुद्दीन फरार झाले. मुलगा अर्शद हॉटेलमध्येच बसून राहिला. बुधवारी १ जानेवारी रोजी सकाळी अर्शदने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच पोलिस आले. मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत अर्शदने वडिलांसह मिळून आई व ४ बहिणींची हत्या केल्याची कबुली दिली. पोलीस बदरुद्दीनचा शोध घेत आहेत. चारबागजवळील नाका परिसरातील शरणजीत हॉटेलमध्ये ही घटना घडली.
कौटुंबिक वादातून आरोपीने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुरुवातीला अर्शदने या घटनेत फक्त स्वतःचा सहभाग असल्याची माहिती दिली होती. मात्र, पोलिसांनी कडक चौकशी केली असता त्याने वडिलांच्या सहभागाचे रहस्य उघड केले. पोलिसांनी कसोशीने चौकशी केली असता अर्शदने सांगितले की, त्याचे वडील बद्रुद्दीन आत्महत्या करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधून बाहेर पडले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लाम नगर, आग्रा येथे राहणारे ७ लोकांचे कुटुंब ३० डिसेंबर रोजी लखनौला आले होते. चारबागजवळील नाका परिसरातील हॉटेल शरणजीतमध्ये खोली घेतली. हॉटेलमध्ये काही कारणावरून त्यांचा वाद झाला.३१ डिसेंबरच्या रात्री बद्रुद्दीनने त्याचा मुलगा अर्शद (२४) सोबत त्याची पत्नी अस्मान, ४ मुली आलिया (९), अक्सा (१६), अलशिया (१९) आणि रहमीन (१८) यांची हत्या केली. या पाच जणांची हत्या केल्यानंतर बद्रुद्दीन हॉटेलमधून निघून गेला. अर्शद हॉटेलमध्येच बसून राहिला.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहे. बुधवारी सकाळी हॉटेलचे कर्मचारी खोलीवर गेले असता त्यांना हा प्रकार समजला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला नाही, तो तिथेच होता. कुटुंब ३० नोव्हेंबरला येथे आले होते अशी माहिती हॉटेल मॅनेजरने दिली.
मृतांच्या मानेवर व मनगटावर जखमेच्या खुणा असल्याचे पोलिसांना आढळून आले. अशा परिस्थितीत शवविच्छेदन अहवालानंतरच हत्या कशी झाली हे स्पष्ट होणार आहे. चारबागजवळील नाका परिसरातील अरुंद गल्ल्यांमध्ये हे हॉटेल आहे. ५ जणांच्या या हत्येचे वृत्त समजताच येथे नागरिकांची गर्दी झाली. पोलिसांनी हॉटेलची खोली सील केली आहे. हॉटेलच्या इतर खोल्यांमध्ये कोण थांबले होते, याचीही माहिती घेतली जात आहे.