अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि लास वेगास येथे ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर झालेल्या स्फोटानंतर होनोलुलूमध्ये झालेला हा तिसरा स्फोट आहे. यामध्ये किमान ३ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.
वॉशिंग्टन : नवीन वर्ष सुरू होताच अमेरिका स्फोटांनी हादरली आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेतील होनोलुलु येथे तिसरा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये किमान ३ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी बुधवारी न्यू ऑर्लिन्समध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर लास वेगासमधील ट्रम्प हॉटेलबाहेर स्फोट झाला होता. न्यू ऑर्लिन्स दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३५ जण जखमी झाले आहेत. तर लास वेगास येथील ट्रम्प हॉटेलच्या बाहेर झालेल्या टेस्ला ट्रकच्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता २४ तासांत होनोलुलूमध्ये तिसऱ्या स्फोटाने दहशत निर्माण केली आहे.
होनोलुलूमध्ये झालेला हा स्फोट नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटात किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. येथील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. होनोलुलू अग्निशमन विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, हा अपघात होनोलुलू आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि यूएस वायुसेना आणि नौदलाच्या संयुक्त तळाजवळील घराबाहेर झाला. हे स्थान यूएसएस ऍरिझोना मेमोरियलपासून थोड्या अंतरावर आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) नुसार, दोन जणांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले आणि इतर २० लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
युरोपियन देश मॉन्टेनेग्रोमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने एका व्यक्तीने बारमध्ये गोळीबार करून त्याच्याच कुटुंबातील सदस्यांसह १० जणांची हत्या केली. कुटुंबाव्यतिरिक्त बार मालक आणि त्याच्या दोन मुलांचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. तसेच चार जण जखमी झाले आहेत.
४५ वर्षीय अको मार्टिनोविक असे आरोपी हल्लेखोराचे नाव असून तो हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व रस्ते बंद करून त्याचा शोध सुरू केला. मात्र, नंतर आरोपी हल्लेखोराने आत्महत्या केल्याचे उघड झाले.