अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
उरुळी कांचन: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे गॅसने भरलेला सिलेंडर रेल्वेच्या रुळावर ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवाने लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
गॅसने भरलेले सिलेंडर रेल्वेच्या रुळावर ठेवून घातपात घडविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उरूळी कांचनच्या हद्दीत रविवारी (ता. २९) रात्री पावणे अकराच्या सुमारास लोको पायलटच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. याप्रकणी उरूळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे व रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या. याप्रकरणी रेल्वेचे लोको पायलट शरद शहाजी वाळके, (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. उरूळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलट शरद वाळके हे नेहमीनुसार रविवारी (ता. २९) रात्री आपल्या हद्दीतील रेल्वे मार्गाची पाहणी करत होते. त्यांना रात्री पावणे अकराच्या सुमारास उरूळी कांचनच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर (रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर २१९/७-५) प्रिया गोल्ड कंपनी गॅसचा सिलेंडर आढळला.
त्यांनी तो सिलेंडर उचलण्याचा प्रयत्न केला असता, सिलेंडरमध्ये गॅस (३९०० किं ग्रॅम वजन) असल्याचे लक्षात आले. तत्काळ वाळके यांनी तो सिलेंडर रेल्वे रुळापासून दूर नेत अज्ञात व्यक्तीचा घातपात घडविण्याचा कट उधळून लावला.
शरद वाळके यांनी या प्रकाराची माहिती तत्काळ पोलिसांना व वरिष्ठांना दिली. त्यानुसार उरूळी कांचन पोलिसांना रेल्वेच्या कलम १५०, १५२ नुसार अज्ञात व्यक्तीवर घातपाताचा घडवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उरूळी कांचन पोलीस करत आहेत.