श्रीनगर : जुने-जाणते नेहमीच रम-रमा-रमी या त्रीसूत्रीपासून चार हात दूर राहण्याचा सल्ला देतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. पण जीत्याची खोड मेल्यावाचुन जात नाही असे म्हणतात ते काही उगाच नव्हे. जम्मू काश्मीरमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथील एका पठ्ठ्याला ऑनलाइन सट्ट्याचा इतका नाद लागला की त्याने चक्क आपले घरदार आणि जमीन अवघ्या सहा महिन्यांत फुंकून टाकली. या व्यतिरिक्त आता त्याच्यावर तब्बल ९० लाखांचे कर्ज झाले आहे. दर दिवशी त्याच्या घरासमोर देणेकऱ्यांची रांग उभी असते. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे.
काश्मिरी व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार ऑनलाइन बेटिंग गेममध्ये त्याने घरदार, जमीन आणि तब्बल ९० लाख रुपये गमावले आहेत. सहा महिन्यांत पैसा, पैसा सर्व काही हातातून निसटून गेल्याचे तो सांगत आहे. 'द कश्मीरियत'च्या X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या तरुणाचा व्हिडिओ फिरत आहे.
अधिक पैसे किंवा कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायचेच ! हीच मानसिकता जुगारास कारणीभूत ठरते. जर १०० लोक बेटिंग आणि जुगार खेळत असतील तर १० व्यसनाधीन होतात. व्यसन कसे निर्माण होते? त्याची लक्षणे काय आहेत? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला पाच लक्षणे दिसत असतील तर समजून घ्या की तुम्हाला सट्टा आणि जुगाराचे व्यसन आहे.
१) पहिले लक्षण म्हणजे सदर व्यक्ती दिवसभर सट्टेबाजी आणि जुगार खेळण्याचा विचार करत राहतो. पुढच्या वेळी सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यासाठी कुठून पैसे मिळतील याचे नियोजन तो करतो.
२) दुसरे लक्षण म्हणजे सट्टेबाजीत लावलेली रक्कम हळू हळू वाढवत नेतो. जास्त पैशाच्या आमिषाला बळी पडून असलेले नसलेले पैसे पणाला लावून बसतो.
३) तिसरे लक्षण म्हणजे आता या फंद्यात न पडता माघारी फिरूयात असे सदर व्यक्तीला नेहमीच वाटू लागते. पण जेव्हा तो या गोष्टींकडे पाठ फिरवतो तेव्हा तो बैचेन होतो त्याचा चीडचिडेपणा वाढतो.
४) चौथे लक्षण म्हणजे सट्टा आणि जुगार आता त्याला आयुष्यातील कटकटींपासून सुटका करणारे एक माध्यम वाटू लागते. कंटाळा आला तर विरंगुळा म्हणून सट्टा खेळणे, मूड ऑफ झाला म्हणून सट्टा खेळणे, खूपच दुख झाले म्हणून सट्टा खेळणे इत्यादि. सट्टा आणि जुगार खेळण्यासाठी
५) पाचवे लक्षण म्हणजे हरलेले पैसे जिंकण्याची इच्छा घेऊन खेळणे. आधी कामधंदे नंतर घरदार आणि नातीगोती गमावून बसणे.
६) सहावे लक्षण कंगाल झाल्यानंतर देखील होने सट्टा खेळण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे.
कोणत्याही व्यसनाचा मेंदूतील 'व्हेंट्रोमेडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स' आणि 'ऑर्बिटल फ्रंटल कॉर्टेक्स' सारख्या क्षेत्रांवर खोलवर परिणाम होतो. तणाव आणि अस्वस्थता येऊ लागते. मेंदूविकारासोबतच हृदयविकारही होतो. शरीरही कमजोर होऊ लागते. विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते. हळूहळू ही स्थिती व्यक्तीला आक्रमक बनवते, ज्यामुळे त्याचे कुटुंब आणि मित्रांवर देखील परिणाम होतो. सततच्या नैराश्यामुळे लोक आत्महत्येचे पाऊल उचलतात.
सट्टा आणि जुगाराच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी अद्याप कोणतेही ठोस औषध तयार झालेले नाही. व्यसन कमी करण्यासाठी काही मानसोपचार पद्धती प्रभावी ठरल्या आहेत. समुपदेशन हा सर्वात ठोस उपचार आहे. कुटुंबातील सदस्यांनी या व्यसनाने ग्रासीत व्यक्तीवर लक्ष ठेवावे. अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास ताबडतोब मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधावा आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञाकडून समुपदेशन करून घ्यावे. बेटिंग आणि जुगाराचे व्यसन मनोचिकित्सा आणि संगीत थेरपीद्वारे देखील बरे होऊ शकते. कुटुंबाचा भावनिक आधार अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी डोपामाइन नियंत्रित करता येते.
टीप : सट्टेबाजी देशात बेकायदेशीर आहे. ते आर्थिक जोखमीच्या अधीन आहे. त्याचे व्यसन लागणे स्वाभाविक आहे. गोवन वार्ता सट्टेबाजीला किंवा कोणत्याही व्यसनाला प्रोत्साहन देत नाही.