पेडणे : हाळी-चांदेल येथे गव्यांच्या उपद्रवामुळे येथील बागायती आणि शेतांमधील पीकांचे आतोनात नुकसान झाले आहे. अन्नाच्या शोधात राना-वनातून हे गवे येतात आणि येथील आंबे, काजू केळी आणि पोफळींच्या झाडांना धक्का देत मुळासकट उन्मळून टाकतात. यामुळे शेतकरी-बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाल्याने ते हवालदिल झालेत.
मोपा विमानतळ झाल्यापासून विमानतळाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावातील शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी शेती करणे देखील बंद केले आहे. गवे आणि इतर जनावरे भातशेतीचे नुकसान करतात म्हणून शेतकऱ्यांनी शेतात आंब्या, काजु, पोफळीची लागवट केली होती. मात्र गव्यांचा एकंदरीत हैदोस बघता शेती सोडण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांना असेच नुकसान सोसावे लागले होते. सरकार दरबारी अर्ज करुन देखील योग्य कारवाई झाली नाही. दिलेली नुकसान भरपाई अगदीच किरकोळ स्वरूपाची असून , त्यातून कागदपत्रे आणि वाटखर्चही सुटत नाही म्हणून शेतकरी सांगतात.
हाळी चांदेल गावाच्या वन्यक्षेत्राच्या बाजूने तिळारीचा कालवा आहे. त्या कालव्यावर असलेल्या पुलांना गेट्स बसवल्यास जनावर शेतात अथवा गावात येणार नाही. केवळ रानटी जनावरांमुळे शेतकरी शेती सोडू लागलेत. : बापू नारूलकर, शेतकरी
मोपा विमानतळ आणि गावांमध्ये वन खात्याची जमीन आहे. खात्याने वनक्षेत्राच्या चहूबाजूने पावर फॅन्सीग करुन जनावरांना आतच ठेवावे. तेथेच खड्डे मारून त्यांची पाण्याची सोय करावी जेणेकरून पाण्याच्या शोधात जनावरे गावात उतरणार नाही : नरेंद्र नारुलकर, शेतकरी