बार्देश : कळंगुट समुद्रकिनारी अवैध व्यवसाय चालवणार्‍या दुकानांवर स्थानिक पंचायतीचा छापा

५ दुकानांना ठोकले टाळे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th December 2024, 04:26 pm
बार्देश : कळंगुट समुद्रकिनारी अवैध व्यवसाय चालवणार्‍या दुकानांवर स्थानिक पंचायतीचा छापा

म्हापसा : राज्यात ठिकठिकाणी अवैध व्यवसायांचे पेव फुटले आहे. बऱ्याचदा या व्यवसायांविरोधात स्थानिक पोटतिडकीने स्वतः उभे ठाकतात व त्यांना पंचायतीची देखील अनेकवेळा साथ मिळते. कळंगूटमध्ये देखील असाच काहीसा प्रकार आज पहायला मिळाला. कळंगुट समुद्रकिनारी अवैधरीत्या व्यवसाय चालवणार्‍या दुकानांवर स्थानिक पंचायतीने छापा टाकला. 

कळंगूट किनारी उभारण्यात आलेल्या अनेक दुकानधारकांकडे योग्य परवाने नाहीत. सदर जागा घेताना परराज्यातील हे व्यावसायिक कपड्यांच्या विक्रीसाठी असलेले परवाने घेतात, पण कालांतराने या जागांवर टॅटूचे दुकान उभे राहिलेले दिसून येते. जर त्यांना हाच वेवसाय करायचा असेल तर त्याने त्याप्रमाणे रीतसर परवाना घेऊनच व्यवसाय करावा असे येथील सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले.   

आज पंचायतीने  बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारी सुमारे पाच दुकाने बंद केली आहेत. तसेच दुकानांसमोरील बेकायदेशीर बांधकामेही हटवली आहेत. आम्ही येत्या सोमवारी संबंधित मालकांना पंचायत कार्यालयात बोलावले आहे, असेही सिक्वेरा म्हणाले.

समुद्रकिनार्‍यावर फिरताना पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणून ही मोहीम राबवण्यात आल्याचे सिक्वेरा यांनी सांगितले. अलीकडेच आमचे प्रभाग सदस्य व भागधारकांनी समुद्रकिनार्‍याची स्वच्छता केली. कारण पर्यटन विभाग हा परिसर स्वच्छ करण्याची तसदी घेत नाही. लोकांना समुद्रकिनार्‍यावर आरामात चालता आले पाहिजे. येतील निसर्गाच्या सौदर्याचा आनंद पर्यटकांना लुटता आला पाहिजे असेही सिक्वेरा म्हणाले.

कळंगूत-बागा किनार्‍यावर तसेच  टिटोच्या गल्लीत वस्थान बसवलेल्या अनधिकृत विक्रेत्यांवर यापुढे कारवाई सुरु राहणार  असल्याचे सिक्वेरा यांनी स्पष्ट केले. तसेच, या आस्थापनांशी आमदार आर्लेकर यांच्या कनेक्शनची अधिकृत नोंद नाही असे त्यांनी नमूद केले.

किनार्‍यावर टाऊट्स तसेच बिर्याणी, काजूगर यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी पर्यटनावर याचा विपरित परिणाम होतोय. स्थानिक आमदारांनी अलीकडे पाहणी करुन याविषयी आवाज उठवला होता. आता यापुढे असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कळंगुट पंचायत प्रशासकीय यंत्रणांच्या सहाय्याने अशा अनधिकृत बेकायदा गोष्टी व आस्थापनांवर कडक कारवाई करेल.

- जोसेफ सिक्वेरा, कळंगुट सरपंच

हेही वाचा