बँकांकडून स्वयंसहाय्य गटांना ३१२ कोटींचे कर्ज
पणजी : स्वयंसहाय्य गटाच्या सदस्यांना अपघात निधन विम्याचा लाभ मिळणार असून यासाठी १४१ विमा सखींची नोंदणी करण्यात आली आहे. बँकांकडून राज्यातील स्वयं साहाय्य गटांना ३१२ कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. स्वयंसहाय्य गटांनी आतापर्यंत ४८० ब्रँड तयार केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी गोवा राज्य ग्रामीण उदरनिर्वाह मोहिमेची (जीएसआरएलएम) बैठक झाली. बैठकीला ग्रामीण विकास यंत्रणा खात्याचे मंत्री गोविंद गावडे उपस्थित होते. स्वयंसहाय्य गटांनी बनविलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सुपर मार्केटची स्थापना केली जाईल.
राज्यात ३२५० स्वयंसहाय्य गट असून त्यांना ८.२८ कोटींचा घोळता निधी देण्यात आला आहे. विविध योजना ६० टक्के केंद्रीय निधी आणि ४० टक्के राज्य सरकारच्या निधीच्या आधारे राबवल्या जातात. स्वयंसाहाय्य गटांची संख्या आणखी ३०० ते ४००नी वाढावी म्हणून प्रयत्न केले जातील. कागदपत्रांच्या डिजीटायजेशनचे काम हाती घेतले जाणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत स्वयंसहाय्य गटांना सरकारी कँटीन्स चालवण्यास दिली जातात. यातून १४१ स्वयंसहाय्य गटांना रोजगार मिळाला आहे. स्टार्ट अप विलेज उद्योजकता उपक्रमाचा ५ तालुक्यातील २०३९ जाणांना लाभ झाला आहे. 'लखपती दीदी'सह 'नमो द्रोण दीदी' अशा सर्व प्रकारच्या योजनांची कार्यवाही राज्यात होणार आहे. लखपती दीदी योजनेचा लाभ १७००० महिलांना मिळवून देण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर दिली.