कुडासे-दोडामार्ग येथील अपघातात झाले होते गंभीर जखमी.
दोडामार्ग : येथे बेकायदेशीररीत्या खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकांखाली आल्याने प्रसाद तुकाराम कांबळे (२८, मूळ-मोर्ले दोडामार्ग, सध्या राहणारा ताळगाव-पणजी ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते संगीत शिक्षक होते. एक उत्तम संवादिनी वादक आणि शास्त्रीय गायक म्हणून त्यांना मान होता. मूळ गाव मोर्ले, ता. दोडामार्ग येथून येत असताना आज सकाळीच त्यांचा अपघात झाला होता.
बेकायदेशीर खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकने साटेली भेडशी,कुडासे तिठा येथे प्रसाद चालवत असलेल्या स्कुटरला जोरदार धडक दिली. येथे जवळच उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्यांना प्रथम दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले. जखमी प्रसाद कांबळे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टर आणि आरोग्य सेविका यांनी प्राथमिक उपचार केले, यानंतर त्यांना गोमेकॉ येथे हलविले. प्रसादच्या कमरेवरून टायर गेल्याने तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. दुखापत गंभीर असल्याने दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हाती आलेल्या माहितीनुसार, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाने पंचनामा होण्याआधीच प्रसादची स्कूटर बाजूला करत ट्रकमधील खडी क्रशरकडे नेत खाली केली. विशेष म्हणजे, स्कुटरला धडक देणारा ट्रक ( जी. ए. ०३ टी. ९१९२ ) याची कागदपत्रे नाहीत तसेच वाहन विमा देखील नाही. त्याचबरोबर या ट्रकची साईड लाईट देखील काम करत नाही. अशा वाहनांचा वापर करत पूर्णपणे बेकायदेशीररीत्या या भागात खडी वाहतूक केली जाते. येथील लोकांनी याबाबत अनेक वेळा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण येथील खडी क्रशर माफीयाची दहशत आणि अरेरावीमुळे काहीच होत नाही अशी स्थिती आहे.