मडगाव : मडगाव शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार दिगंबर कामत यांची तर कार्निव्हल समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक कामिल बार्रेटो यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. कार्निव्हल मिरवणुकीसाठी २ मार्च तर शिमगोत्सव मिरवणुकीसाठी २२ मार्च या तारखांची मागणी पर्यटन खात्याकडे करण्यात येणार आहे.
मडगाव पालिका मंडळाची विशेष बैठक गुरुवारी सकाळी बोलावण्यात आली होती. या बैठकीच्या अजेंड्यावर शिमगोत्सव समिती व कार्निव्हल समितींच्या अध्यक्षांच्या निवडीचे विषय होते. सभेवेळी कार्निव्हल समितीच्या अध्यक्षपदासाठी नगरसेवक कामिल बार्रेटो यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. तसेच शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदासाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. या दोन्ही नावांवर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. शिमगोत्सव व कार्निव्हल समितीच्या मिरवणुकीवेळी या मार्गावर नागरिक गर्दी करतात पण पालिकेसमोर येऊनच सादरीकरण केले जाते. त्यामुळे या मार्गावर आणखी एका ठिकाणी व्यासपीठ उभारुन त्याठिकाणी कला सादरीकरण केल्यास नागरिकांना त्याठिकाणीही चित्ररथ व कलाकारांची कलाकारी पाहता येणार असल्याचे नगरसेवक राजू नाईक यांनी सुचवले व नगराध्यक्षांनी त्यावर निश्चित निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की, पर्यटन खात्याकडून यावर्षीच्या कार्यक्रमांसाठी शिमगोत्सव समिती व कार्निव्हल समितींची निवड करुन पाठवण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार विशेष सभा आयोजित करुन निर्णय घेण्यात आला. कार्निव्हल समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक कामिल बार्रेटो यांची निवड करण्यात आली. मडगावातील शिमगोत्सव हा दरवर्षी मडगाव शिमगोत्सव समितीच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून साजरा केला जातो. मडगाव शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार दिगंबर कामत यांची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या इतर सदस्यांची नावेही लवकरच निश्चित करुन पर्यटन खात्याला अहवाल पाठवण्यात येणार आहे. याशिवाय गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही कार्निव्हल व शिमगोत्सवाची मिरवणूक ही पारंपरिक मार्गाने होली स्पिरिट चर्च ते मडगाव पालिका या मार्गावरुनच होणार असल्याचे स्पष्ट केले.