नेमकी घटनेच्या रात्रीच सीसीटीव्हीची रिकॉर्डिंग पडली बंद
म्हापसा : म्हापसा : मयडे पुलार येथील श्री रवळनाथ मंदिर फोडून अज्ञात चोरांनी फंडपेटी पळवली. मंदिरापासून काही अंतरावर नदी शेजारी पुलाच्या नजीकच्या पायर्यांवर ही फंडपेटी ठेवली, मात्र ती या चोरांना फोडता आली नाही व तिथेच टाकून ते पसार झाले. महत्वाचे म्हणजे घटनेच्या दिवशीच मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्याची रेकॉर्डिंग तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. त्यामुळे चोरट्यांची छबी त्यात बंदिस्त झाली नाही.
ही चोरीची घटना आज गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली. नित्यनेमाने एक शाळकरी विद्यार्थी मंदिरात देवाला फुले वाहण्यासाठी गेला होता. यावेळी मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचा त्याच्या निदर्शनात आले. लगेच त्याने घरी जाऊन घटनेची माहिती पालकांना दिली. सदर मुलाचे पालक आणि स्थानिकांनी लगेच मंदिराकडे धाव घेतली. मंदिरातील फंडपेटी गायब झाल्याचे त्यांना दिसले. तसेच मंदिराच्या दरवाजावरील कुलूप तोडल्याचे लसखात आले. हे कुलूप आणि ते तोडण्यासाठी वापरलेली लोखंडी सळी चोरांनी तिथेच टाकली होती.
त्यानंतर पळवलेल्या फंडफेटीचा लोकांनी आजूबाजूला शोध घेतला. तेव्हा मंदिरापासून अंदाजे 100 मीटरवर पुलाच्या दुसर्या बाजूच्या कडेला असलेल्या विसर्जनस्ळाच्या पायर्यांवर नदी काठी ती फंडपेटी सापडली. फंडपेटीचा दरवाजावरील कुलूप मजबूत असल्यामुळे ते चोरांना तोडता आले नाही. त्यामुळे आतील रक्कम त्यांच्या हाती लागली नाही. रहिवासी सुभाष शेटये यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद केली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रथम रॉबर्ट जीपवरील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. म्हापसा पोलीस उपनिरीक्षक पंढरी चोपडेकर, सहाय्यक उपनिरीक्षक अजय गावकर यांनी सहकार्यांसह घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच श्वान व ठशे तज्ञांचा वापर करण्यात आला. या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरा होते. मात्र घटनेची रिकॉर्डिंग या कॅमेराच्या फुटेजमध्ये झाली नाही. बुधवारी रात्री ९ पर्यंतच सीसीटीव्ही फुटेजची रिकॉर्डिंग झाली. परंतु त्यानंतर सकाळपर्यंत रिकॉर्डिंग बंद पडली. गुरूवारी सकाळी जेव्हा डिव्हीआरची तपासणी झाली तेव्हा रिकॉर्डिंग पुन्हा सुरू झाली. डिव्हीआरमध्ये दोष असल्यामुळे त्यातील फुटेज वारंवार तपासण्याची सूचना तज्ञांनी केली होती. मात्र त्याकडे स्थानिकांनी दुर्लक्ष केले. यामुळे घटनेची रिकॉर्डिंग झाली नाही व चोरांची छबीही कॅमेरात कैद होऊ शकली नाही.
गुरूवारी पहाटे ३ च्या सुमारास नेहमीप्रमाणे एक स्थानिक कामावरून घरी गेला होता. त्यावेळी मंदिराचा दरवाजा ठीकठाक असल्याचे त्याने पाहिले होते. त्यामुळे ही मंदिर फोडण्याची घटना पहाटे ३ नंतरच घडली. तसेच सकाळ झाल्यामुळे चोरांना फंडपेटी फोडणे शक्य झाले नसावे असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी ३० डिसेंबर रोजी ही फंडपेटी उघडण्यात आली होती.