सासष्टी : सोनसडोत पुन्हा आग, आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
16th January, 10:58 am
सासष्टी : सोनसडोत पुन्हा आग, आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू

मडगाव : सोनसडो यार्डातील कचर्‍याला आग लागण्याची घटना पुन्हा एकदा गुरुवारी सकाळी घडली. मडगाव अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी आगीवर पाणी मारण्यास सुरु केली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, ही आग कचर्‍याच्या वरील भागातून लागलेली असल्याने कुणीतरी आग लावलेली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 



मडगाव अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनसडो यार्डातील प्रकल्पाच्या शेडनजीक तोडण्यात आलेली झाडे, घरातील जुने साहित्य व इतर कचर्‍याचा ढीग आहे. याच ढीगाला आग लागली. याची माहिती पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास मिळाली. तत्काळ अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले व आगीवर पाण्याचा मारा करुन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग कचर्‍याच्या ढीगात आतपर्यंत गेलेली असल्याने ती विझवताना अडचणी आल्या. अग्निशामक दलाचे अधिकारी हर्क्युलन गिल डिसुझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी येत अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले.



मात्र, आग कचर्‍याच्या ढीगात आतपर्यंत गेल्याने हवेचा संपर्क होताच पुन्हा पेट घेण्याचा प्रकार होतो. यासाठी आता पालिका प्रशासनाला सांगून जेसीबीव्दारे कचरा बाजूला करत पाणी मारण्याचे काम सुरु आहे. बाजूला असलेल्या मनोविकास शाळेच्या बाजूने संरक्षक भिंत असल्याने त्याठिकाणाहून पुढे जाण्यास मिळत नाही. त्यातच ३३ केव्ही उच्च दाबाची वीजवाहिनी असल्याने विद्युतप्रवाह बंद करण्यात आला का याची शहानिशा अधिकार्‍यांकडून वेळेत करण्यात आलेली नाही.

आतापर्यंत २० हजार लिटर पाण्याचा मारा करण्यात आलेला असून सोनसडो येथील पाण्याचा साठाही संपुष्टात आलेला आहे. झाडे व इतर कचरा टाकण्यात आलेला असून उतारावरील ढीगाला आग लागली असून आतपर्यंत पाणी मारल्याशिवाय आगीवर नियंत्रण आणणे शक्य नाही व कचर्‍याच्या ढीगातून धूर येत राहणार असल्याचे ते म्हणाले.

यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात आगीची घटना

यापूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोनसडो कचरा यार्डातील शेडमधील साठवणूक केलेल्या कचर्‍याला आग लागण्याची घटना घडलेली होती. त्यावेळी आग लावण्यात आल्याची शक्यता नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनी व्यक्त केली होती. त्या आगीत दोन बेलिंग मशिन व वीजवाहिन्या व इतर साहित्य जळून गेलेले होते.


हेही वाचा