आमदार व्हेंजींकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
मडगाव : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राज्याच्या विकासाचा प्रथम विचार होतोे. यामुळेच राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत विरोधी आमदारांच्या मतदारसंघातील कोणतीही कामे ते अडवून न ठेवता कामांना मंजुरी देतात, अशा शब्दांत आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.
बाणावली येथील ट्रिनिटी हायरसेकंडरी स्कूलच्या पायाभूत सुविधांचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. यावेळी आमदार व्हेंझी यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य पिमेंता उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी आमदार व्हेंझी यांनी सांगितले की, देशात इतर कोणत्याही राज्याला न मिळालेली संधी गोव्याला मिळाली व गोव्याने आपले अस्तित्व स्वतंत्र राखले. या जनमत कौलाच्या दिनाला अस्मिताय दिन म्हटले जाते. त्यावेळी डॉ. जॅक सिक्वेरा व भाऊसाहेब बांदोडकर यांनी जनमत कौलावेळी एकमेकांविरोधात काम केले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनल्यानंतर भाऊसाहेब बांदोडकर यांनी राजकीय विरोधकांनाही विकासकामांपासून दूर ठेवले नाही. आताही भाजपची सत्ता असून आपण आम आदमी पक्षाचा आमदार असूनही विकासकामांना मंजुरी दिली जात आहे. ती अडवून ठेवण्याचे प्रकार होत नाहीत. याच सामंजस्याच्या भावनेतून गोव्याला ब्रँड गोवा बनवण्याचे स्वप्न साकार होणार आहे. आगामी काळातही आवश्यक ती कामे हाती घेऊन पूर्ण केली जातील, असेही व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.
राजकीय विरोधक म्हणून मागील दोन ते तीन वर्षे जी कामे झालेली नाहीत किंवा लोकांना विश्वासात घेतलेले नाही त्यावर आवाज उठवत राज्य सरकारवर टीका केली आहे. राजकीय विरोधक म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आपल्यात विचारांमध्ये तफावत असू शकते. ब्रँड गोवा निर्माण करण्यासाठी आम्ही लढा देत असू पण हे हेवेदावे विकासाच्या कामांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कधीही आणलेले नाहीत, असे व्हेंझी व्हिएगस म्हणाले.
शिक्षण क्षेत्रातील विविध कामे, पायाभूत सुविधा अशा विकासकामांना मंजुरी दिलेली आहे. ज्याप्रमाणे भाऊसाहेब बांदोडकर यांनी कोणताही अहंकार न बाळगता, हेवेदावे न ठेवता राज्याच्या विकासकामांना चालना दिली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघाच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी दिली जात आहे, असे आमदार व्हेंझी यांनी सांगितले.