३४ हजारांचा मुद्देमाल जप्त : दोघे संशयित रत्नागिरी पोलिसांच्या स्वाधीन
मडगाव : रत्नागिरी येथे चोरीच्या प्रकरणात हवे असलेल्या दोन गुन्हेगारांना कोकण रेल्वे पोलिसांनी पकडले आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी शादाब मोहम्मद मुश्ताकी (२८) व झुबिर लियाकत (२२) या दोन्ही मूळ उत्तरप्रदेशातील संशयितांकडून ३४ हजारांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी रत्नागिरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
कोकण रेल्वे पोलिसांकडून मडगाव रेल्वेस्थानकावरील सुरक्षिततेची काळजी घेतानाच परराज्यातील गुन्हेगारांनाही पकडण्याचे काम केले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी पोलिसांकडून एका चोरीच्या प्रकरणात दोन गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. संशयितांच्या शोधासाठी महाराष्ट्राच्या नजीकच्या गोवा पोलिसांनाही चोरट्यांबाबतची आवश्यक माहिती देण्यात आलेली होती. त्यानुसार कोकण रेल्वे पोलिसांकडून मडगाव रेल्वेस्थानकावर गस्तीदरम्यान बुधवारी रात्री दोन संशयित आढळून आले. मडगाव रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरुन संशयितांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करत त्यांची ओळख पटवण्यात आली. संशयित शादाब मुश्ताकी व झुबिर लियाकत हे रत्नागिरीतील चोरीतील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रत्नागिरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
संशयितांकडून चोरीचा 34 हजार रुपयांचा मुद्देमाल कोकण रेल्वे पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. दोन्ही संशयितांना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.