पणजी : एचआयव्ही / एड्सच्या जागृतीसाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि गोवा एड्स नियंत्रण संस्थेद्वारे राष्ट्रीय रेड रन २.० चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार १८ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता मिरामार येथे होणार असल्याची माहिती गोवा एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प अधिकारी डॉ. ललिता हुम्रसकर यांनी दिली. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उमाकांत सावंत हेही उपस्थित होते.
डॉ.हुम्रसकर यांनी सांगितले की, या १० किमीच्या शर्यतीत सर्व राज्यात झालेल्या स्पर्धेतील पहिले दोन विजयी धावपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धा महिला, पुरुष आणि तृतीय पंथीय अशा तीन विभागात होणार आहे. प्रत्येक विभागातील प्रत्येकी तीन विजेत्यांना ५० हजार, ३५ हजार आणि २५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धा मिरामार सर्कल एनआयओ ओयटे ते मिरामार सर्कल या मार्गावर होणार आहे.
याशिवाय सामान्य जनता, दिव्यांग व्यक्ती, पोलीस, सरकारी अधिकारी, यांच्यासाठी विशेष २ किमी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. शर्यत पूर्ण करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक आणि मेडल देण्यात येणार. आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय सचिव व्ही हेकाली झिमोमी, निखिल गजराज आदी उपस्थित राहणार आहेत.
उमाकांत सावंत यांनी सांगितले की, १० किमी च्या मुख्य शर्यतीचा फ्लॅग ऑफ झाल्यावर १५ मिनिटांनी २ किमीच्या शर्यतीचा शुभारंभ होईल. या शर्यतीत गोव्यातील एक हजारहून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत. तर १० किमीच्या राष्ट्रीय स्पर्धेत १९० धावपटू सहभागी होणार आहेत. बक्षीस वितरण सोहळा सकाळी ८ वाजता मिरामार येथे होणार आहे