वास्को येथील तस्करीचा सीबीआयकडून पर्दाफाश
पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने वास्को येथील गांधीनगर - वरुणापुरी येथे धडक छापेमारी करून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल साठ्यातून विमानात वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (एटीएफ) तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी सीबीआयने विठ्ठल चव्हाण, मंतेश पवार, महेंदर पास्सी आणि मैनूद्दीन शेख या चार जणांना रंगेहाथ अटक केली होती. या चार जणांना मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
गांधीनगर-वरुणापुरी येथे एटीएफ या ज्वलनशील पदार्थाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानुसार सीबीआयने गुरुवार, दि. १२ रोजी सायंकाळी ३.३० ते रात्री ११.३० दरम्यान वास्को येथील गांधीनगर - वरुणापुरी येथील मुख्य रस्त्यावर छापेमारी करून मुख्य संशयित विठ्ठल चव्हाणसह मंतेश पवार, महेंदर पास्सी, मैनूद्दीन शेख या तिघा साथीदारांच्याही सीबीआयच्या विशेष पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून २.७५ लाख रुपये किमतीचे ३ हजार लिटर अॅव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) जप्त केले. याचसोबत आरोपींकडून वापरण्यात आलेली दोन वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. या चारही जणांना त्याच दिवशी मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली होती. त्यानंतर वरील संशयितांनी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने त्या चारही जणांना ५० हजार रुपये व त्याच रकमेचा एक हमीदार, चौकशी पूर्ण होईपर्यंत मुरगाव तालुक्यात जाण्यास बंदी, आठ दिवस सीबीआयमध्ये हजेरी लावणे व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सीबीआयने वरील संशयिताची चौकशी करून यात गुंतलेल्या आणखीन आठ जणांना अटक केली आहे. तसेच चार टँकर जप्त केले आहेत. अटक केलेल्या आठ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.