सिद्दिकीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th December, 12:10 am
सिद्दिकीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या कोठडीतून पसार झालेला आणि ८ दिवसांनी केरळ पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आलेला सिद्दिकी उर्फ सुलेमान खान (५०) याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात बुधवारी किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सिद्दिकीला गुरुवारी डिस्चार्ज दिल्यानंतर शुक्रवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे.

सिद्दिकी खानला जमीन हडप प्रकरणी विशेष तपास पथकाने १२ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर सिद्दिकीला रायबंदर येथील गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.

सिद्दिकीने १३ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस कोठडीतून पलायन केले होते. त्यासाठी त्याने आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याची मदत घेतली होती. त्यानंतर गुन्हा शाखेच्या पथकाने ईर्नाकुलम - केरळ पोलिसांच्या मदतीने संशयित सिद्दिकीला २१ रोजी अटक केली. त्यानंतर सिद्दिकीला २३ रोजी गोव्यात आणून पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. याच दरम्यान मंगळवारी त्याने कोठडीत असताना स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तिथे किरकोळ शस्त्रक्रिया करून गुरुवारी डिस्चार्ज दिला. त्यानंतर सिद्दिकीची जुने गोवा पोलिसांच्या कोठडीत रवानगी केली. जुने गोवा पोलिसांनी शुक्रवारी त्याला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने सिद्दिकीची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

हेही वाचा