माहेर ही संकल्पनाच खरं तर सुखद आहे. सगळ्या आनंददायी आठवणींचा ठेवा म्हणजे माहेर. जिथे राहून किंवा भेट देऊन आपण सुख अनुभवतो ती जागा म्हणजे माहेर. माहेर या शब्दाची फोड केली तर मायेचे घर अशी करता येईल.
माहेर मातृ गृहही असते म्हणूनच ते सुखाच्या आश्रयाची जागा ठरते कारण तिथे आई असते. लहानपणी भोंडल्याच्या गाण्यात आम्ही मुली “अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळते” असं म्हणायचो. मुक्तपणे खेळायची, मनपसंद बागडायची जागा म्हणजे प्रत्येक मुलीचं माहेर. तिला जिथे विसाव्याचे चार क्षण अनुभवायला मिळतात ते स्थान. तिथे तिचे ऋणानुबंध जुळलेले असतात, तिचा गोतावळा असतो आणि त्यांच्यात तिचा जीव अडकलेला असतो. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीचे ते हक्काचे लाड करून घ्यायचे ठिकाण असते. तापलेल्या उन्हात थंड वाऱ्याची झुळूक कशी तनामनाला शांत करते, निववते तशी माहेराला भेट तिच्या मनाला शांत करते. प्रत्येक सासुरवाशिण स्त्रीसाठी ते उत्साहाचं टॉनिक असतं. पुढची जगायची उमेद नव्याने मिळते. तिच्या माहेरीच्या आठवणींचा ठेवा तिला पुन्हा पुन्हा जागवावासा वाटतो. मनात आनंदाच्या लहरी उठतात. ती जागा जिथे आपल्याला सुख आणि आनंदच मिळणार याची तिला खात्री असते. सर्व सुखसंपन्न असं सासर असलं तरी प्रत्येक मुलीला तिच्या माहेरची ओढ आणि प्रेम वाटतच असतं. ते गरीब असो की श्रीमंत.
माहेर... मग ते एखाद्या सासुरवाशिण सुनेचं असेल किंवा मुलीचं असेल, तिला माहेरची ओढ सतत मनापासून जाणवत असते. अगदी तसंच दूर देशी गेलेल्या किंवा काही कारणांनी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेल्या मुलालाही आपल्या घराची तितकीच ओढ वाटत असते. त्याची भावंडे, त्यांच्यासोबत घालवलेला तो लहानपणीचा सुखाचा काळ, आपले सगेसोयरे, अंगणात खेळलो बागडलो ते आपले सवंगडी, यांची आठवण त्यालाही प्रकर्षाने होत असते. जेव्हा पुरुष आपल्या बालपणीच्या घरापासून दूर जातात तेव्हा त्यांच्याही मनात आपल्या घराकडे जायची ओढ कायम असते. घराच्या जुन्या आठवणी ताज्या होत जातात. हे त्यांचेही माहेरच म्हटले पाहिजे. म्हणजे फक्त स्त्रियांसाठीच माहेर ही संकल्पना सुखद असते असे नाही, तर पुरुषांनाही आपल्या अश्या आवडत्या ठिकाणी जावंसं वाटणं साहजिकच आहे. आईने लक्षात ठेवून आपल्यासाठी केलेले आवडीचे पदार्थ चाखण्याची त्यांनाही ओढ असते. त्यांच्या मनात त्यांच्या माहेरची गोडी दाटलेली असते.
बहिणाबाई म्हणतात ‘आपल्या लेकीला माहेरचं सुख मिळावं म्हणूनच तिची आई सासरी नांदत असते’ ही गोष्ट मात्र खरी आहे. जिथे आई नाही, ते माहेर सुनं सुनं वाटतं. माहेरी जरी भाऊ भावजय चांगली असतील तरीही आईची जागा कुणी घेऊ शकत नाही. आताच्या जमान्यात मात्र हेच म्हणणं थोडा फेरबदल करून मांडलं पाहिजे. आता आईचं वय झाल्यावर आणि तिची काळजी घेणारं कुणी नसेल, तर मुलीने तिला आपल्या घरी आणून तिला सुख दिलं पाहिजे. तिची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आईला खूप वर्षांनी आपण माहेरी आल्यासारखं वाटेल. मुलीचं घर हे आता तिच्यासाठी माहेर बनलं पाहिजे. म्हणजे आईला माहेर मिळण्यासाठी लेकीने सासरी नांदायला पाहिजे.
माझ्या वडिलांच्या जाण्याने अगदी एकटी पडलेली आई मी पाहिली आहे. तिचा एकटेपणा कमी करण्यासाठी मी तिला माझ्याकडे घेऊन आले होते. तिनेही काही आढेवेढे न घेता माझ्याकडे राहून आपले मन नातवंडात, माझ्या घरात, बागेत काम करत, जमेल तितके मला किचनमध्ये मदत करत रमवलं, वेळ घालवला पण तरीही थोड्या दिवसांनी तिला तिच्या घरी जायचं होतं. ‘हे कितीही झालं तरी जावयाचं घर’ हे असे विचार तिच्या डोक्यात होतेच. त्यामुळे जास्त दिवस न राहता ती परत निघाली तेव्हा म्हणाली, “तुझ्याकडे मी, माहेरी राहावं तसं राहिले. सुख अनुभवलं, पण माहेर हे नेहमी असं थोड्या दिवसांसाठीच चांगलं असतं.” हे ही मनाला पटलं. मुलगी आपल्या हक्काच्या माहेरी थोडे जास्त दिवस राहिली तरी लोक नको नको ते बोलू लागतात. त्यामुळे तिला जास्त दिवस माहेरी राहता येत नाही.
आपल्या संत वाङमयात ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी’ असं म्हंटलं आहे. इथे त्यांना पंढरीला जाऊन अशा सुखाची अनुभूती होत असते, जशी एखाद्या मुलीला माहेरी गेल्यानंतर होते. वारकरी होऊन आनंदाने टाळ मृदंगाच्या चालीवर ठेका धरून नाचत-गात आपल्या सहसवंगड्यांबरोबर विठ्ठल नामाचे संकीर्तन करत आपला वेळ व्यतीत करायला मिळतो. ना कसली चिंता, ना कसली व्यथा. जिथे संपूर्णपणे आनंदच आनंद भरलेला असतो. दु:ख, चिंता लयाला गेलेली असतात. तल्लीन होऊन भगवंताच्या चरणी लीन होत आध्यात्मिक सुखाचा ते आनंद घेत असतात. मनाला अतीव सुख देणारे ते खरे माहेर असते. दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने ते आपल्या माहेरी पंढरीची वारी करतात. असा हा माहेरचा महिमा थोर आहे.
प्रतिभा कारंजकर, फोंडा