आता मागे वळणे नाही…

“हॅलो”, पलिकडनं आवाज आला. “कशी आहेस?” दोन मिनिटं स्तब्धच झाली सुचिता. कितीतरी वर्षांनी परत ऐकत होती तो आवाज.

Story: आठवण |
17 hours ago
आता मागे वळणे नाही…

ज सुचिता तशी लवकरच घरी आली होती कामावरून. पेशाने शिक्षिका असलेली सुचिता तशी संध्याकाळीच येत असे शाळा संपल्यानंतर शिकवणीचे वर्ग घेऊन. घरी एकटीच असल्याने करमत नसे म्हणून ती शिकवण्या घेत होती. पण आज सकाळी सियाचा म्हणजे तिच्या मुलीचा फोन आला होता कोल्हापूरहून. ती कोल्हापूरात मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती. अतिशय हुशार आणि गुणी विद्यार्थिनी. लवकरच तिला सुट्टी पडणार होती आणि त्यासाठीच तिने फोन केला होता. 

लेक खूप दिवसांनी घरी येणार ह्या आनंदात सुचिताने चक्क शिकवणी वर्गाला सुट्टी दिली व आली घरी. खूप आनंदात होती सुचिता. मस्तपैकी चहा घेत व्हरांड्यात बसली असतानाच मोबाईल वाजला. खरं तर मुलीच्या आठवणीने आणि गरम चहा व गार वाऱ्याच्या झुळकिने सुखावलेल्या सुचिताला फोन घ्यायचा खरंतर कंटाळाच आला. दुर्लक्ष केले पण परत रिंग वाजली. तंद्रितच तिने स्क्रीन बघितले आणि ती क्षणभर अचंबित झाली. फोन घ्यावा की न घ्यावा. पण रिंग वाजतच होती. शेवटी तिने फोन उचलायचे ठरवले. 

“हॅलो”, पलिकडनं आवाज आला. “कशी आहेस?” दोन मिनिटं स्तब्धच झाली सुचिता. कितीतरी वर्षांनी परत ऐकत होती तो आवाज. काहीच फरक नाही पण फक्त जरा थकलेला वाटत होता. ज्या आवाजाकरिता आपण वीस वर्षे वाट पाहिली, होय! तोच आवाज तिच्या नवऱ्याचा अशोकचा. 

अशोक-सुचिता एक आदर्श जोडपे. जसे सर्व मध्यमवर्गीय असतात तसे. रुसवे, फुगवे, प्रेम, सहवास सर्व त्या वया अनुरूप यथायोग्य. नुकतेच लग्न झाले होते. अशोक पेशाने इंजिनिअर होता. सुचिता पदवीधर. एका चांगल्या कंपनीत अशोक काम करत असे. एक छोटीशी जागाही होती त्यांची. मोठ्या हौशीने सजवली होती सुचिताने. खाली मालक महाजन परिवारही चांगला होता. त्रास नव्हता.

दोन वर्षांनी सियाचा जन्म झाला. आनंदी आनंद. सर्वकाही सुरळीत चालू होते. आणि एक दिवस अचानक अशोक घरी आला तो ट्रान्सफर ऑर्डर घेऊनच. ती सुद्धा इथे तिथे नाही, तर परदेशी यू.एस. मध्ये. खरंतर ही आनंदाची गोष्ट. पगार वाढणार, स्टेटस वाढणार सगळं ओके. पण एकच मेख होती की तो एकटाच जाणार होता. अर्थात अशोकशिवाय जगणे सुचिताला आणि सियालासुद्धा तसे अवघडच होते. पण अशोकने समजूत काढली. आणि तसंही तो प्रत्येक वर्षी येणारच होता. नवीनच आलेला मोबाईल हा प्रकारही होताच. महिना भराने अशोक पोहोचला अमेरिकेत. रोज त्याच्या वेळेनुसार फोन करत असे दोघींना. पैसे वेळेवर पाठवी, सगळे नीटनेटके. वर्षाने सुट्टीला आल्यावर “तोच दिवाळी दसरा, नाही आनंदा तोटा” असे होई सुचिताला. 

शेवटी पाच वर्षे कशी सरली कळलेच नाही. खरंतर अशोकला परदेशात प्रमोशनही मिळाले होते. आता त्याने सुचिताला न्यायला हरकत नव्हती. सुचिताही त्यासाठी आतुर होती. पण काहीतरी थातूर मातूर कारण सांगून अशोक टाळत असे. त्यात आताशा फोनही कमी झाले. शेवटी सुचिताच फोन करायची त्याला. तसे बोलणेही कमीच झाले होते आणि त्याच वेळी अशोकने सांगितले तो ह्या वर्षी सुट्टीत येणार नाही म्हणून. सुचिताच्या मनात शंकेची पाल चूकचूकली. शेवटी पत्नी ती, काय काय घडू शकते ह्याचा अंदाज तिला आला होता. आणि व्हायचे तेच झाले. 

एक दिवस फोनवर भांडण झाल्यावर अशोकने खरे सांगितले. अशोक तिथे एका मुलीच्या प्रेमात पडला होता. इतका की आता तो मागे फिरणे शक्य नव्हते. सुचिताने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण फरक पडला नाही. अशोकने पाठ फिरवली कायमची. 

संसार दुभंगलेला, पदरात एक पोर. गोंधळून गेली सुचिता. त्यात अशोकने पैसे पाठविणेही बंद केले. नातेवाईक किती दिवस सांभाळणार? खरोखरच वाईट अवस्था झाली तिची. जीव द्यावा असा विचार करणाऱ्या सुचिताच्या मदतीला धाऊन आले ते घरमालक महाजन आजी आजोबा. शेजारीच असल्याने त्यांना सगळी कल्पना आली होती. खूप सावरले त्यांनी तिला. आपल्या ओळखीने एका शाळेत शिक्षिका म्हणून कामाला लावले. मुलीचा आपल्या नातीप्रमाणे सांभाळ केला त्यांनी. 

खचलेली सुचिता सावरू लागली हळूहळू. परत आशेचा किरण दिसू लागला सियाच्या रूपाने. मेडिकलला पोरगी गेल्यावर खूश झाली सुचिता. आता अश्या आयुष्याची सवय झाली तिला. मी आणि माझी मुलगी एक कोषच विणून घेतला तिने स्वतः भोवती. ह्यात आता कोणाला स्थान नव्हते. 

निवांत झाली होती सुचिता. आणि त्या फोनने तिच्या सगळ्या स्मृती परत चाळवल्या. फोनवर बोलताना अशोक खूप खचलेला वाटत होता. त्याची नोकरी मंदीमध्ये गेली होती. सहा महिन्यापूर्वी पैश्याचा ओघ संपताच त्याची मैत्रीणही सोडून गेली त्याला. अशोक एकटा पडला परदेशात त्यावेळी त्याला पत्नीची आठवण झाली. 

उद्याचं तिकीट आहे परतीचं, परवा पोहोचेन असे अशोकने सांगितले. थंडपणे ऐकून घेतले तिने. होय थंडपणेच. खरंच काय गरज होती तिला त्याची? ज्या वेळी तो हवा होता त्या वेळी फसवले त्याने, ज्याला जीव लावला, सर्वस्व दिले पण त्याने त्याग केला तिचा. अणि आता ती आव्हाने पेलायला शिकली होती. कोणाचीही ढवळाढवळ नको होती तिला. 

दोन दिवसांनी अशोक आला. पाहतो तर दाराला कुलूप. वीस वर्षापूर्वी सुचिताला बाहेर जायचे असेल तर ती चावी दरवाज्याच्यावर ठेवी. आठवले अशोकला. त्याने वर हात घातला चावी काढली. गेली असेल इथेच कुठेतरी असे म्हणत दरवाजा उघडला. शेवटला सुट्टीत अशोक आला होता त्या वेळी जसे घर होते तसाच फील होता. अचानक समोर ठेवलेल्या चिठ्ठीकडे लक्ष गेले त्याचे, ती सुचिताने लिहिली होती. “ह्या घरात तुझे स्वागत आहे. आजपर्यंत तुझे हे घर मी सांभाळले. तू परत आलास पण उशिरा. आता खरंच गरज नाही मला कोणाची. मी समर्थ आहे. माझा शोध घेऊ नये ही विनंती. मुलगी माझ्याकडेच राहील काळजी नसावी.”

चिठ्ठी वाचून अशोक मटकन खालीच बसला. आपली चूक कळली त्याला. पण काय करू शकणार होता तो? नियतीने सुड उगवला होता ना...


रेशम जयंत झारापकर,  मडगाव, गोवा.