हळुवार फुंकर

एकच तीन अक्षरी साधा शब्द पण कितीतरी आशय त्यात दडलेला दिसतो आणि डोळ्यापुढे येते ती ओठाचा चंबू करून अर्धोन्मिलित नेत्राने मायेने, प्रेमाने मुखावाटे सोडलेली ती हवा. “फू—” असा तो सोडलेला हवेचा विसर्ग आणि अस्फुटसा आवाज.

Story: मनातलं |
18 hours ago
हळुवार फुंकर

“काय झालं माझ्या सोनूल्याला बघू” म्हणत आईने घातलेली त्याच्या बोटावरची हळुवार फुंकर त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणते. खरं तर आईने आपल्याला झालेला ‘बाऊ’ बघावा, लक्ष द्यावं म्हणूनच त्याचं ते खोटं खोटं रडणं होतं. मोठ्या माणसांचं पण बरेचदा असंच असतं. आपल्याकडे कुणीतरी सहानुभूतीने पहावं म्हणून त्यांची धडपड, एखाद्या हळुवार फुंकर किंवा शब्दाच्या स्पर्शाने शमणारी असते. प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी भावनिक, मानसिक आघात घडत असतात. दु:खद प्रसंग, वाईट घटना घडत असतात. अशा वेळी मन दुखरे झालेले असते. तेव्हा कुणीतरी नाजुकशी फुंकर घातली की ती वेदना विरून जाईल किंवा वेदना शोषून घेईल अशी जादू त्या फुंकरीमध्ये असते. आत्ता इतकं दु:ख होतं, गेलं कुणीकडे? असं वाटावं इतकी ती फुंकर प्रभावी असते.

माणसाचा स्वभाव मोठा विचित्रच! थोड्याश्या अहंभावाने मनावर स्वत्वाची राख जमू लागते. अशा वेळी कुणीतरी उपदेशपर फुंकर मारून ती राख उडवून टाकावी लागते. तरच त्याला पुन्हा हवा मिळते. हळुवारपणे समजावणारी फुंकर ही फार मोठी कामगिरी करून जाते. निराश आणि उदास झालेल्या मनातला आत्मविश्वास जेव्हा डगमगू लागतो, तेव्हा कुणीतरी जवळच्या व्यक्तिने घातलेली शब्दांची फुंकर मरगळलेल्या मनाला तजेला देते. 

अशी प्रत्यक्षात फुंकर मारतानाचे दृश्य आपण नेहमी बघत असतो. चुलीतली, शेकोटीतली लाकडे प्रज्वलित करण्यासाठी एक छोटीशी फुंकर पेट घ्यायला पुरेशी असते. अंगणात खेळताना वाऱ्याने डोळ्यात गेलेल्या धुळीच्या कणाला मैत्रिणीची एक फुंकर बाहेर काढू शकते, गरमागरम चहा बशीत ओतून त्यावर फुंकर घालून आई देते तेव्हा तो लगेच थंड होतो. बाळाला दूध पिताना ठसका लागला की आई हळूच त्याच्या टाळूवर फुंकर घालते. प्रेयसीच्या गालावरच्या बटांना जेव्हा मुजोर वारा उडवत असतो तेव्हा तिच्या प्रियकराने फुंकर मारून ती बाजूला करावी अशीच तिची अपेक्षा असते. रात्रीची धुंदी डोळ्यावर चढताना मंद तेवणाऱ्या दिव्यावर मालवून टाक दीप म्हणत हळुवार फुंकर घालून तो विझवला जातो. तव्यावर पोळी शेकताना बसलेला चटका पटकन फुंकर मारून शांत करता येतो. दुधावर धरलेली साय बाजूला करण्यासाठी ही फुंकर मारून दूध ओतलं जातं. काचेवरची धूळ झटकण्यासाठी एक फुंकर उपयोगी असते. गरमीच्या दिवसात उष्णतेने अंगाची लाही लाही होत असताना जिवाची तगमग होत असते अशावेळी हवेच्या झोताने अंगावर फुंकर मारावी तसा मनाला गारवा मिळतो. सुखद झुळूक अंगाला स्पर्शून जाते सारा देह निवतो त्याला खरी फुंकर म्हणावी. शाळेत असताना ओली पाटी लवकर सुकवण्यासाठी आपण फुंकरच मारायचो हे आठवले. श्री कृष्णाने त्याच्या बासरीतून फुंकलेली फुंकर किती तरी गोप गोपिकांना मंत्र मुग्ध करत असेल. 

सर्व साधारण माणसाला आपण निराश असताना आपल्या जवळच्या किंवा आपण कमावलेल्या माणसांचा आधाराचा हात, प्रेमाचे, मायेचे दोन शब्द हवे असतात पुन्हा सावरायला, उभं ठाकायला.  तीच खरी फुंकर असते आशेची, गारव्याची. फुंकर एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळुवार, भावनाविष्कार. अडचणीच्या वेळी एखाद्याची छोटीशी मदत ही फुंकर घालण्यासारखीच असते. 

वाढदिवसाच्या दिवशी केकवर लावलेल्या मेणबत्या फुंकर मारून विझवल्या जातात. खरं तर ही आपली परंपरा नाही. आपण दीप प्रज्वलित करून ओवळतो. सायन्सच्या दृष्टिकोनातूनही मेणबत्ती विजवल्याने केकवरील जंतूंची संख्या वाढते असा निष्कर्ष काढला आहे. आरोग्यासाठी ते धोकादायक असतं. दिव्याला फुंकर मारू नये असं आपलं शास्त्र सांगतं.

एकच तीन अक्षरी साधा शब्द पण कितीतरी आशय त्यात दडलेला दिसतो आणि डोळ्यापुढे येते ती ओठाचा चंबू करून अर्धोन्मिलित नेत्राने मायेने, प्रेमाने मुखावाटे सोडलेली ती हवा. “फू—” असा तो सोडलेला हवेचा विसर्ग आणि अस्फुटसा आवाज. ही एक सहज क्रिया थंडीच्या थंड हवेत तीच फुंकर घन रूपात दिसते तेव्हा ती पाहताना मजा वाटते. ‘आला मंतर कोला मंतर जादू मंतर छु’ असं म्हणत मारलेली फुंकर बाळाच्या जशा वेदना दाह कमी करतात तशाच मोठ्यांच्या मनातल्या वेदना कमी करायचं काम शब्दरूपी फुंकर मारून कमी करता येतात. 

जीवनात चटके सोसावे लागणाऱ्या खडतर जीवाला सहनुभूतीची फुंकर मारून तिचे जगणे सुसह्य बनवता येते. नुसती कोरडी सहानुभूती नव्हे, तर त्या बरोबर तुमची ऐच्छिक मदत तिचे जीवन सहज सुंदर बनवू शकते. पतीच्या अकाली मृत्यूनंतर तिच्या घरच्यांची मदत तिच्यासाठी खूप मोलाची फुंकर मारणारी ठरते. एखादी व्यक्ती कठीण प्रसंगातून जात असताना तिचे शाब्दिक समुपदेशन करून तिला मानसिकदृष्ट्या समर्थ बनवणं हे ही फुंकर मारण्या इतकंच महत्त्वाचं ठरतं. अशा प्रसंगी स्वामी समर्थांचे लाख मोलाचे उद्गार “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” ही हळूच हळुवारपणे मारलेली फुंकर तुमच्या मनाला गारवा आणि आधार मिळवून द्यायला पुरेशी असते कारण अशावेळी मनातली श्रद्धा योग्य मार्गाकडे नेते.


प्रतिभा कारंजकर, फोंडा