पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम असे संगीत देताना गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने मखमली साज चढवला. या गाण्याची धुंदी इतकी आहे, की हे गाणे ऐकताना आजही आपले मन मेंदीच्या पानावर झुलत राहतं.
माहेरी असलेल्या मेंदीच्या पानांची वाटून लावलेली मेहंदी नववधू जेव्हा सासरी जाते, तेव्हा आपल्या त्या रंगलेल्या मेहंदीच्या हाताकडे पाहताना तिचे मन माहेरच्या आठवणींच्या हिंदोळ्यात झुलताना माहेरच्या आठवणीत बुडून गेले आहे. आणि तिच्या या मनाची अवस्था या गाण्याचे गीतकार आणि कवी सुरेश भट यांनी आपल्या ‘मेंदीच्या पानावर... मन अजून झुलते गं...’ या गाण्यात आपल्या खास गझल शैलीत शब्दबद्ध केली आहे.
या गाण्याला पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी अप्रतिम असे संगीत देताना गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने मखमली साज चढवला. या गाण्याची धुंदी इतकी आहे, की हे गाणे ऐकताना आजही आपले मन मेंदीच्या पानावर झुलत राहतं. हृदयनाथ यांनी एखाद्या गाण्याला चाल लावली की ते गाणे अजरामर होऊन जाते, हा आजवरचा अनुभव आहे. त्यांच्या नावातच हृदय असल्याने त्यांनी स्वरबध्द केलेली गाणी ही प्रत्येकाच्या हृदयात शिरतात आणि तिथेच वास करतात. त्यांनी त्यांच्या हळुवार संगीताने गीतातील शब्दांना स्वरसाज चढवला की ते गाणे सर्वार्थाने मखमली होऊन जाते.
‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं
जाईच्या पाकळ्यांत दंव अजून सलते गं’
गाण्याच्या या पहिल्या कडव्यात नवधूला माहेरची ओढ लागलेली असतानाच तिच्या अंगणातील जाईच्या नाजूक पाकळ्यांवर पहुडलेले दंवबिंदूचे मोतीही सलत असल्याचा भास होतो. याच कडव्याकडे दुसर्या अर्थाने पाहिल्यास जाईच्या पाकळ्यांना नववधू तर दंवबिंदू म्हणजेच तिला नुकताच झालेल्या पतीदेवाच्या स्पर्शाची उपमा दिल्याचे दिसते.
‘झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं
हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं’
‘झुळझुळतो’ आणि ‘हुळहुळतो’ या शब्दांतून यमक साधताना कवी सुरेश भट यांनी या गाण्यात ताल निर्माण केला आहे. झुळझुळणार्या वार्यासोबत तुळशीचा देह म्हणजेच नववधूचा देह हा हुळहुळतो आहे हे सांगताना सुरेश भट यांनी तुळस ही स्त्रीची सात्विक तसेच परिपक्व असलेली एक प्रतिमा आहे हे नकळत विषद केले आहे. या नववधूला संसाराचा अनुभव नाही. त्यामुळे संसाराची जबाबदारी पेलताना, संसार सांभाळताना, लग्नानंतरची तिची कर्तव्ये पार पाडताना ती काहीशी डगमगून जाते हे कवीला या कडव्यात दर्शवायचे आहे. त्यामुळे ‘हुळहुळतो’ या शब्दाला वेगळाच अर्थ दिलेला दिसून येतो. प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारा ‘गं’ हा शब्द इतका बेमालूमपणे सामावला आहे की एखादी जवळची व्यक्तीच त्या नववधूला हे सर्व सांगत आहे, असे वाटत राहते.
नुकतेच लग्न होऊन सासरी आलेल्या नववधूच्या अंगावरील हळद अजून उतरली नाही, हे दर्शवताना कवी या गाण्यात पुढे म्हणतात की,
‘अजून तुझे हळदीचे अंग
अंग पिवळे गं अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे गं!’
सासरी आल्यावर घराची जबाबदारी घेताना त्या घरातील रीतीरिवाज तिला समजून घ्यायला अजून काही अवकाश लागेल. घरातील प्रत्येक व्यक्तीचे मन सांभाळताना ते मन तिला जिंकायचे आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात तिला मानाचे स्थान प्राप्त करायचे आहे आणि हे सर्व करताना तिच्यातील गुणांची नक्कीच कसोटी लागणार आहे. हे सर्व करताना ती जरी त्या घरात नवीन असली तरी तिला हे सर्व जबाबदारीने सांभाळताना लागणारे प्रौढत्व अजून नाजूकच आहे, हे कवी सुरेश भटांनी आपल्या गाण्याच्या शेवटच्या ओळीत अगदी चपखलपणे मांडलेले दिसते.
कवी सुरेश भट हे प्रामुख्याने गझल सम्राट म्हणून ओळखले जातात. मराठी साहित्यात मराठी गझल हा साहित्य प्रकार रूढ व्हावा आणि श्रोत्यांनी तो चोखंदळपणे स्वीकारावा यासाठी सुरेश भट हे कायम झटत राहिले. त्यांची प्रत्येक गझल किंवा गाणे हे त्यांनी आपल्या शब्दांच्या चौकटीत न बसवता ती गझल स्वरुपात सादर केली. आणि म्हणूनच त्यांची गाणीही मनाला भुरळ पाडल्याशिवाय रहात नाहीत!
कविता आमोणकर