जनाप्पा

जनाप्पा उर्फ जनार्दन आमचा सालगडी. रोज सकाळी तांबूचे दूध काढायला वेळेवर यायचा. पण मागच्या दोन महिन्यापूर्वी जनाप्पा मुंबईला गेला व तेथून थेट अमेरिकेत. आता आमचा सालगडी अमेरिकेत थेट कसा पोहचला ते ओघाने येईलच.

Story: आठवण |
07th December 2024, 04:48 am
जनाप्पा

मी चहाचे आधण ठेवले आणि दरवाजावर खट खट झाली. आता सकाळी सकाळी कोण आले? दार उघडते तर समोर साक्षात जनाप्पा! मी उडालेच. “अरे तू मुलाकडे गेला होतास ना अमेरिकेत? असा  अचानक कसा आलास?” मी विचारले. त्यावर “मगे सांगतय.” असे मोघम बोलून तो पहिला गोठ्यात गेला. दहा मिनिटात जनाप्पा भरलेली दुधाची चरवी घेऊन स्वयंपाक घरात आला. चरवी माझ्या हातात देऊन म्हणाला, “ताईनू वाईच चाव टाका.” मी उत्तरले, “अरे चहा देतेच पण तू असा अचानक कसा काय आलास?” “सांगतय सांगतय” म्हणून जनाप्पाने सगळी कथा सांगायला सुरुवात केली.

मुळात जनाप्पा हा अगदी नाव जेमतेम लिहिता येईल इतका शिक्षित. आधीच्या सर्व पिढ्यांप्रमाणेच सालगडी म्हणजेच लोकांच्या घरी, शेतात, गोठ्यात काम करून उपजिविका करणारा. आपली पत्नी, मुलगा आनंदा बरोबर गावातच छोट्याश्या झोपडीत राहणारा. आहे त्यात सुख मानून जे मिळते ते देवच देतो हे मानणारा. असा हा जनाप्पा रोज पहाटे दूध काढायला येत असे. त्याच्या मुलाने-आनंदाने हुषारीच्या बळावर शिक्षणाच्या सगळ्या पायऱ्या यशस्वीरित्या पार केल्या. इतक्या, की शेवटी अमेरिकेत स्थिरावला. म्हातारा जनाप्पा व त्याची पत्नी दोघेच घरी. आनंदा परिवारासोबत वर्षा-दोन वर्षांनी येत असे. तशातच एक दिवस जनाप्पाची पत्नी निवर्तली. 

एका वर्षी आनंदा आला तोच बापाला अमेरिकेस घेऊन जायच्या तयारीने. सुरुवातीला जनाप्पा थोडा बावरला. अर्थात कणकवलीच्याही पुढे न गेलेल्या जनाप्पाला अमेरिकाच काय, मुंबई सुद्धा माहीत नव्हती. पण आनंदापुढे त्याचे काही चालेना. शेवटी जनाप्पा निघाला अमेरिकेस.  

लालपरीत सुद्धा आयुष्यात फक्त २ ते ३ वेळा बसलेला जनाप्पा थेट जंबो जेटने झुईईईई करत पोहोचला अमेरिकेत. सुनेनेही चांगले स्वागत केले त्याचे. ऐसपैस घर, गार्डन, गाडी जनाप्पा हुरळूनच गेला. झोपायला थंडगार स्वतंत्र खोली, स्वयंपाकाची कटकट नाही. सगळं आयतं. आयुष्यभर कष्ट काढलेला जनाप्पा सुखावला. त्यात घरभर नातवंडांचा दंगा. प्रेमळ मालवणी बोलणारी सून, मुलगा सगळं काही व्यवस्थित चालू होतं.

जनाप्पा आता बऱ्यापैकी स्थिरावला मुलाकडे. आनंदा कधीतरी फोन करून खुशाली कळवी. जनाप्पाच्या शेजारी एक म्हातारे जोडपे राहत होते. मुलांचा पत्ता नाही. दोघेच जण फक्त. आपली आजारपणे, औषधे सांभाळत आयुष्य चालले होते. एक तर शेजारी आणि दुसरे म्हणजे मालवणी माणूस. जनाप्पाने शेवटी बरोब्बर ओळख काढली. मग सुरू झाल्या सुखदुःखाच्या गोष्टी. भाषा वेगळी पण संदर्भ एकच. दिवस बरे चालले होते. जवळजवळ तीन महिने लोटले जनाप्पाला अमेरिकेला जाऊन. रोज सकाळ-संध्याकाळ शेजाऱ्यांना जाऊन भेटणे, हा जनाप्पाचा आता नित्यक्रम झाला. आनंदाने आता ठरवले की बापाला आता इकडेच ठेवायचे.

आनंदाचे त्या दृष्टीने प्रयत्न चालूच होते आणि तो दिवस उजाडला. शेजारी म्हातारा काही कामानिमित्त दुसऱ्या राज्यात गेला होता आणि अचानक म्हातारीला अटॅक आला आणि ती गेली. शेजारी आनंदाने खूप धावपळ केली. पण फायदा झाला नाही. आता म्हातारा जेरी परदेशात. मुले कुठे माहिती नाही. काय करायचे? शेवटी जेरीने आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराची सगळी जबाबदारी तेथील एका संस्थेवर सोपवली. ते लोक पोलीस घेऊन आले, अँब्युलन्समधून म्हातारीला घेऊन गेले. सोबत आनंदाही गेला. रडारड नाही, नातेवाईक नाही, दिवस कार्य नाही. जनाप्पा उघड्या डोळ्यांनी हे सगळे पाहत होता. बायको गेली तरी जेरी तसा निवांत होता. उलट त्याच्यापेक्षा जनाप्पाच हे सगळे प्रकार बघून हादरला होता. 

विचारीन विचारीन म्हणत शेवटी त्याने आनंदाकडे विषय काढलाच. “काय रे? पुढे काय झाला म्हातारेचा?” “आता होऊचा काय? नेली तिका पेटित्सून आणि गाडली जमिनीत.” आनंदा उत्तरला. “मगे?” जनाप्पाचा प्रश्न. “अवो बाबानु मगे काय, एक गुलाबाचा फूल दवरल्यानी जेरीन मगे आमी इलोव.” “मग दिवस कार्याचा काय?” जनाप्पा. आनंदा म्हणाला, “बाबांनु हडें तसलां काय नाय. कोण मेलो की त्याका पेटीयेत घालून पुरतत. मगे जाला.” आता जनाप्पा मुळापासून हादरला. अहो, कोकणी माणूस शेवटी तो कट्टर. माणूस मेल्यावर सगळे जमतात, त्याला जाळतात, मग दिवस कार्य, मग मोक्ष मिळून तो स्वर्गात जातो. हेच आयुष्यभर बिंबलेले मनावर.

विचार करून करून जनाप्पा थकला. रात्रीची झोप येईना. आपल्या मरणानंतर आपण अमेरिकेत एका पेटीत घालून जमिनीत पुरलेल्या अवस्थेत झोपलोय अशी स्वप्ने पडू लागली त्याला. शिवाय मोक्ष मिळाला नाही तर स्वर्गात कसा जाणार? आणि स्वर्गात गेलो नाही तर माझ्या बायकोला मी कसा भेटणार? अश्या अनेक प्रश्नांनी त्याला भंडावून सोडले. आपण मेल्यानंतर आपण अजिबात पेटीत झोपायचे नाही असे त्याने ठरविले. पण इथे अमेरिकेत तशी रीतच आहे असे उत्तर त्याला मिळाले. झाले, माथे फिरले कोकणी जनाप्पाचे. 

माणसाच्या मूलभूत हक्कावर गदा म्हणजे कोकणी माणूस खवळून उठतो तसे काहीसे झाले जनाप्पाचे. शेवटी “मी मेल्यावर इथे जमिनीत पुरून घेणार नाही. मी माझ्या माणसात जाऊनच मरून मोक्ष मिळवणार.” हे त्याने मुलाला अगदी निक्षून सांगितले. आनंदा चक्रावूनच गेला. त्याने आणि त्याच्या पत्नीने जनाप्पाला समजवायचा खूप प्रयत्न केला. पण ऐकेल तर तो कोकण्या कसला? अगदी हटूनच बसला जनाप्पा. शेवटी मुंबईत राहणाऱ्या चुलत भावाला सांगून त्याने जनाप्पाला विमानात बसवून दिले परत येण्यासाठी. मुंबईला उतरून तडक गावी आला जनाप्पा रात्री ट्रेनने.

जनाप्पाने सगळे रामायण आम्हा दोघांना ऐकवले. मग विचारले, “ताईनू बरोबर ना माझा? मोक्ष काय तो हडेच मेळूक व्होयो. नुसता जमिनीत पडून काय करूचा?” आम्हाला हसावे का रडावे हेच कळेना. शेवटी आमचे हे उठले. म्हणाले, “जनाप्पा आता मोक्ष नंतर. आलास परत तर रोज सकाळी येत जा परत दूध काढायला आणि आता भाकरी खाऊनच जा.” जनाप्पा आनंदला. शेवटी आपल्या  शिकलेल्या अमेरिकन मुलापेक्षा आपणच हुशार ह्याची खात्री पटली त्याला.


रेशम जयंत झारापकर,  मडगाव, गोवा.