मराठी महिन्यातल्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला "आषाढी एकादशी"म्हटले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपण गणेश चतुर्थी किंवा दिवाळी ज्या उत्साहाने साजरी करतो, त्याच उत्साहाने ही "आषाढी एकादशी"साजरी केली जाते.
आषाढी एकादशी म्हणजे नक्की काय?असे म्हणतात की ह्या दिवशी देव नारायण सागरात झोपी जातात, म्हणून ह्याला देवशयनी एकादशीअसेही म्हटले जाते. देवशयनी एकादशी म्हणजेच चातुर्मासाला प्रारंभअसे मानले जाते. चातुर्मास म्हणजे चार महिने. शयनी एकादशी ते कार्तिक एकादशी या चार महिन्यांसाठी विष्णू देव आपले सर्व कार्यभार इतर देवतांच्या हाती सोपवून निद्रेला जातात असे म्हटले जाते. कार्तिक एकादशीपासून परत आषाढी एकादशीपर्यंत भगवान विष्णू आपले कार्यभार स्वतःच्या हाती घेतात.
आषाढी एकादशी हा वारकरी समाजाचा सर्वात मोठा उत्सव आहे.आता वारी म्हणजे काय?तर ही एक दिंडी किंवा पदयात्राअसे म्हणू शकतो. मात्र या पदयात्रेत विठ्ठल नामाचा जप किंवा गजर केला जातो. महाराष्ट्र-गोवाच्या कानाकोपऱ्यातून भाविक लोक विठ्ठल नामाचे नामस्मरण करत, भजन-कीर्तन करीत, अनवाणी चालत पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला येतात. याच भाविकांना वारकरीम्हणतात आणि वारकरी जी पदयात्रा करतात, तिला आषाढी वारीअसेही म्हटले जाते. या वारीत भाविक संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पादुका पालखी रथातून पंढरपूरला घेऊन येतात.पायी केली जाणारी ही यात्रा फार जुनी आहे. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय.वारीचे दोन प्रकार आहेत: आषाढी वारी आणि कार्तिक वारी. कार्तिक वारी कार्तिक महिन्याच्या एकादशीला केली जाते. वारकरी पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान करून व चंद्रभागेचे दर्शन घेऊन पंढरीचा नाथ श्री भगवान पंढरीनाथांचे दर्शन घेतात.ही वारी खूप पवित्र आहे. एखाद्याला वारीत जाता आले नाही, तरी वारीतील वारकऱ्यांचे दर्शन किंवा सेवा केली तरी भगवंत आपल्याला पावतो. एवढी पवित्र आहे ही वारी.
एकादशीला भाविक, भक्त आपल्या गावातील विठ्ठल मंदिराकडे दिंडीदेखील काढतात. या दिवशी विठ्ठल नामाचा जप केला जातो, विठ्ठल दर्शन घेतले जाते, तसेच एकादशीनिमित्त उपवासहीकेला जातो. भाविक या दिवशी निर्जला उपवास किंवा फलाहारकरतात. आषाढी एकादशीचा उपवास आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा उपवास चातुर्मासाच्या म्हणजेच चार महिन्यांच्या कालावधीची सुरुवात दर्शवितो. भाविकांचा असा विश्वास आहे की एकादशीला उपवास केल्याने सर्व पापे मुक्त होतात आणि मोक्ष प्राप्ती होते.या दिवशी अन्न आणि वस्त्र दान केल्याने सुद्धा पुण्य मिळतेअसे म्हटले जाते.
- श्रद्धा मोने
व्हाळशी गोवा