प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे काही लोक येतात, जे आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. माझ्या आयुष्यात नितीन सर असेच एक मार्गदर्शक बनून आले. त्यांनी मला केवळ नाटकाच्या रंगमंचावर उभे राहायला शिकवले नाही, तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर कसे चालावे हेही दाखवले. आज मी जे काही आहे, ते त्यांच्यामुळेच आहे.
मी आयुष्यात अशा एका टप्प्यावर होते, जिथे मला वाटायचे की मी काही वेगळी नाही, काही खास नाही; पण सर भेटले आणि त्यांनी जणू मला आरसा दाखवला. त्यांनी मला माझ्यातील सौंदर्य, कलागुण, माझा आत्मविश्वास आणि माझी ताकद दाखवली. मी जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर उभी राहिले, तेव्हा माझे हात थरथरत होते, पाय हलत नव्हते. त्यावेळी त्यांनी फक्त माझ्या डोळ्यांत पाहिले आणि शांतपणे म्हणाले, "भिऊ नकोस. स्टेज तुझं आहे." हे शब्द 'मृत आत्मा' या नाटकाच्या कला अकादमी स्पर्धेदरम्यानचे आहेत, जेव्हा मी स्टेजवर होते. ते शब्द आजही माझ्या कानात घुमतात.
त्यांनी मला केवळ नाटक शिकवले नाही, तर ते प्रत्यक्ष कसे साकार करायचे आणि संवादातून कसे व्यक्त व्हायचे हेही शिकवले. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी मला जीवन जगण्याचे भान दिले. त्यांनी मला सांगितले की, "मंचावर जितके खूप काही बोलतोस, तितकेच स्वतःच्या आत खोलवर ऐकायलाही शिक." हेच वाक्य माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. आज मी कोणताही निर्णय घेताना, लोकांशी व्यवहार करताना आणि अगदी स्वतःला समजून घेतानाही त्यांची शिकवण माझ्यासोबत असते, असे मी खात्रीने म्हणू शकते. ते केवळ माझे शिक्षक नाहीत, तर ते माझे बळ आहेत.
ते कायम माझ्या पाठीशी उभे राहिले – गडबडीत, अडचणीत, संकोचात... अगदी खंबीरपणे. त्यांच्यामुळेच मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले. त्यांचे आणखी एक वाक्य, "मी तुम्हाला काही शिकवले नाही, आपण एकमेकांकडून शिकायला हवे," हे आजही माझ्या मनात घर करून आहे. जेव्हा यश मिळते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील चमक आठवते आणि जेव्हा अपयश येते, तेव्हा त्यांचा अदृश्य हात माझ्या पाठीशी आहे असे वाटते.
कधी कधी वाटते की आयुष्यात काही माणसे केवळ आपल्याला भेटण्यासाठीच तयार झालेली असतात... नितीन सर हे माझ्या आयुष्यातील असेच एक नाव आहे. मी जेव्हा नाटकात पहिले पाऊल टाकले, तेव्हा अभिनयाची आवड होती; पण दिशा नव्हती. सरांनी मला केवळ भूमिका दिली नाही, तर माझी खरी ओळख करून दिली, माझ्या क्षमतांची जाणीव करून दिली. त्यांनी कधीही "तू हे करू शकशील का?" असे विचारले नाही. ते नेहमी म्हणाले, "तू हेच करण्यासाठी जन्मली आहेस." खरं सांगायचं तर, कधी कधी जेव्हा मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही, तेव्हा त्यांनीच माझ्यावर विश्वास ठेवला. आजही जेव्हा मी एखादी नवीन गोष्ट हाती घेते, तेव्हा पहिले नाव मनात येते ते सरांचे.
कलेचा आदर, कामामध्ये शिस्त आणि माणसांशी जोडलेपण हे सगळं त्यांनी नुसतं शिकवलं नाही, तर ते जगून दाखवलं.
सरांच्या रिहर्सलमध्ये 'वेळ म्हणजे वेळ' हा नियम होता. पण त्या वेळेत त्यांनी आम्हाला केवळ अभिनय नाही, तर जबाबदारीही शिकवली. "प्रेक्षकाला फसवू नका, ते तुमच्या डोळ्यांतून सत्य शोधतात" हे त्यांचं वाक्य अजूनही माझ्या डोक्यात कायम आहे आणि कायम राहील. नाटकातले संवाद पाठ करताना मी अनेकदा माझ्या आयुष्याचे प्रश्न सोडवले आहेत आणि कविताही लिहिली. हे शक्य झालं, कारण सरांनी मला नाटकाकडे केवळ स्पर्धा म्हणून नाही, तर साधना म्हणून पाहायला शिकवलं.
आज मी जिथे आहे आणि जे काही नाटक क्षेत्रात करते आहे, त्यात नितीन सरांचा खूप मोठा वाटा आहे. ते केवळ रंगमंचावरच्या भूमिका शिकवणारे नाहीत, तर मला स्वतःची भूमिका शोधायला शिकवणारे आहेत.
सर, तुमच्यासाठी एक लहानशी कविता:
माझे गुरू
दोन वर्षांचा तुमचा सहवास,
शिकवलं आयुष्याचं खरं खास.
तुमच्यामुळे उघडल्या नव्या दिशा,
तुमच्याच शब्दांनी जागली आशा.
तुमची शिकवण म्हणजे वरदान,
तुमच्यामुळे समजलं यशाचं ज्ञान.
नितीन सर, तुमचे उपकार
मोठे, तुमच्यामुळेच जगणं
झालं खूप सोपे.
तुमच्या शिकवणीने भरारी घेतली,
प्रत्येक स्वप्न सत्यात उतरली.
तुमचं नाव घेतलं की
वाटतो अभिमान,
धन्यवाद सर, तुमचा आधार.
- मल्लिका देसाई
काणकोण