चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...

कधी कधी काहीच न बोलताही हातात हात घेऊन एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम असतं. मनातल्या भावना मनात ठेवून त्या व्यक्त न करता केवळ हातात घेतलेल्या हाताच्या स्पर्शातून व्यक्त होणार्‍या मनातल्या भावना ज्याला समजल्या, तोच खरा प्रेमाचा हकदार!

Story: शब्दगीते |
18 hours ago
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...

हळुवारपणाने हातात हात घेताना त्यातील प्रेमाचा उबदारपणा जाणवायलाही ज्याचा हात हातात घेतला आहे, त्याचेही मन तितकेच संवेदनशील असेल तर केवळ त्या हाताच्या स्पर्शातूनही उच्च प्रेमाची साक्ष त्या दोन्ही जीवांना पटते.

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात 

सखया रे, आवर ही सावर ही चांदरात!

प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या लेखणीतून जेव्हा हे असे शब्द स्फुरतात, तेव्हा हे शब्द प्रेमाचे सुगंधी अत्तर लावूनच प्रसवतात. आणि मग हे शब्द सुगंधित होऊन जातात, ते कायमचेच! ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...’ सुगंधी शब्दांना जेव्हा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या जादुई संगीताद्वारे आशा भोसले यांच्या सुरमयी शब्दांचा साज चढला, तेव्हा या गाण्याची जादू रसिक प्रेक्षकांच्या मनावर जादू करून गेली, ती कायमचीच... कामाच्या व्यापामध्ये गुरफटून गेलो असताना जेव्हा जेव्हा अशी गाणी कानावर पडतात, तेव्हा आपले मन नकळत आपल्या जीवनात घडलेल्या त्या सुगंधित क्षणांना आठवत रहाते! आणि हे गाणं संपल्यावर वास्तवात आपण जेव्हा परत येतो, तेव्हा ती मोठी शिक्षाच वाटते आणि मन पुन्हा पुन्हा हे गाणे ऐकण्याचा आग्रह धरू लागतं!  

चांदण्याच्या दुग्ध वर्षावात प्रेमी युगुल फिरत असताना प्रियकराने धरलेल्या हात प्रेयसीला खूप काही सांगून जातो. अनावर झालेल्या अव्यक्त भावना जेव्हा स्पर्शातून व्यक्त केल्या जातात, तेव्हा ती त्याला त्याच्या भावनांना आवर घाल असे मोघम शब्दांत सांगताना म्हणते, ‘सखया रे आवर ही सावर ही चांदरात!’

आशा भोसले यांनी हे गाणे गाताना त्यातील प्रत्येक शब्दांना सुरेल साज चढवला आहे. सुरेश भट यांची ही रचना जितकी अप्रतिम आहे, तितकेच पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेले संगीत हे त्याच तोडीची आहे. प्रत्येक सुराची लय आणि लवचिकता आशा भोसले यांनी आपल्या गोड गळ्यातून साकारताना हे गाणे उंचावर नेऊन ठेवले आहे.

कवी सुरेश भट यांनी या गीतातील दुसर्‍या कडव्यात फार सुरेख भावना व्यक्त केल्या आहेत. जिथे प्रेमाची भावना नाही, अशा  गावातून या गाण्यातील प्रेयसी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी एकटीच आली आहे असे सांगताना सुरेश भट पुढे या गीतात रस्त्यावरच्या दिव्यांना कळलावे म्हणून संबोधतात. प्रेयसी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी एकटी जरी आली, तरी ती ज्या रस्त्यावरून आली, त्या रस्त्यावरील दिव्यांनी तिला पाहिले असून ते कळलावे आहेत असे कवी म्हणतात. हे कळलावे दिवे कधीच मागे पडले आणि त्यांची या प्रेयसीला अजिबात पर्वा नाही. आणि चांदण्यात फिरताना आपल्या प्रियकराने धरलेला हात या रस्त्यावरील वृक्षांनी ही पाहिलेला असून या तरुछाया साक्षीदार आहेत आणि या तरुछाया या प्रेमी युगुलाची प्रेमकहाणी जाणून आहेत. म्हणूनच सुरेश भट या गाण्यातील दुसर्‍या कडव्यात लिहितात...

निजलेल्या गावातून आले मी एकटीच,

दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच,

ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात !...

कवि सुरेश भट यांची प्रेमगीते ऐकताना अरसिकही रसिक होऊन गेला तर त्यात नवल ते काय?

सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर?

तुज वारा छळवादी अन हे तारे फितूर!

श्वास  तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात!

शेवटच्या या कडव्यात तर सुरेश भट यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार इतक्या सुंदर शब्दात व्यक्त केलाय की हे गाणे ऐकतानाच आपण त्या गाण्याच्या प्रेमात पडून जातो. शास्त्रीय संगीतात सर्व रागांचा राजा ज्याला मानतात, तो सर्व स्वर कोमल असणारा मालकंस हा राग रात्री १२ ते ३ या रात्रीच्या तिसर्‍या प्रहरी आळवला जातो. आणि याच वेळेत चांदण्यात फिरताना झालेल्या हाताच्या स्पर्शाला मालकंस रागाची उपमा देताना ‘स्पर्श तुझा पारिजात’ असे म्हणताना त्या हाताचा स्पर्श हा पारिजातकासारखा सुगंधी आणि तितकाच कोमल आहे हे सांगताना सुरेश भट यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. व्वा! कवी सुरेश भट, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका आशा भोसलेताई... तुम्ही या गाण्याने सर्वांना चांदण्याच्या चांदणचुर्यात सर्वांना न्हाऊ घातलंत...


कविता आमोणकर