युवा भारतीय महिला आशिया चॅम्पियन्स

बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव : गोंगडी त्रिशाला सामनावीराचा पुरस्कार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd December, 11:49 pm
युवा भारतीय महिला आशिया चॅम्पियन्स

क्वालालंपूर : १९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने टी २० फॉरमॅटमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा ४१ धावांनी पराभव केला. विजेतेपदासाठी ११८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव केवळ ७६ धावांवर आटोपला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ गडी गमावून ११७ धावा केल्या. भारताकडून सलामीवीर गोंगडी त्रिशाने ४७ चेंडूत ५ चौकार आणि २ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ५२ धावांची शानदार खेळी केली. मिथिला विनोद १७ धावा, कर्णधार निक्की प्रसाद १२ धावा आणि आयुषी शुक्ला १० धावा केल्या. संघाचे पाच फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. बांगलादेशकडून फरझाना इस्मीनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर निशिता अक्तेरने २ आणि हबीबा इस्लामने एक विकेट मिळवली.
११८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात खूपच खराब झाली. मोसम्मत इवा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. बांगलादेशने ६४ धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या. त्यांच्या दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. यामध्ये फहमिदा चोया १८ धावा आणि झुरिया फिरदौस २२ धावा यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला क्रीजवर टीकता आले नाही. बांगलादेशने अखेर त्यांचा डाव १८.३ षटकांत ७६ धावांत गारद झाला. भारताकडून आयुषी शुक्लाने ३.३ षटकात सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय पुरुनिका सिसोदिया आणि सोनम यादव यांनी २-२ विकेट्स आपल्या नावावर केल्या.गोंगडी त्रिशाचे स्पर्धेतील दुसरे अर्धशतक
भारताची सलामीची फलंदाज त्रिशा हिने ४७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. तिने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीसाठी तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील हे तिचे दुसरे अर्धशतक आहे. याआधीही तिने बांगलादेशविरुद्ध ५८ धावांची नाबाद खेळी खेळली होती.
स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१९ वर्षांखालील आशिया कपमध्ये त्रिशाने ५ डावात ५३.०० च्या सरासरीने आणि १२०.४५ च्या स्ट्राईक रेटने १५९ धावा चोपल्या. तर श्रीलंकेच्या मनुडी नानायकाराने ३ डावात ५६ च्या सरासरीने ११२ धावा केल्या. या दोघींशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला १०० धावांपर्यंतचा टप्पा गाठता आला नाही. भारताची यष्टिरक्षक फलंदाज जी कमलिनी हिने ५ डावात २८.३३ च्या सरासरीने एकूण ८५ धावा केल्या.
स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाज
डावखुरा फिरकीपटू आयुषी शुक्लाने ५ सामन्यात ५.४० च्या सरासरीने आणि ३.२७ च्या इकॉनॉमी रेटने १० बळी घेतले. या स्पर्धेत ती सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. बांगलादेशच्या अख्तरने ५ सामन्यात ७.७७ च्या सरासरीने ९ विकेट्स घेतल्या. भारताची दुसरी डावखुरी फिरकीपटू पारुनिका सिसोदिया हिने ८.४४ च्या सरासरीने ९ विकेट घेतल्या.
भारताने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला, तर नेपाळविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला. यानंतर सुपर-४ मध्ये भारताने बांगलादेश आणि श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले.