यूपी : पिलीभीत चकमकीत ३ खलिस्तानी दहशतवादी ठार; शस्त्रे जप्त

यूपी-पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
यूपी :  पिलीभीत चकमकीत ३ खलिस्तानी दहशतवादी ठार; शस्त्रे जप्त

लखनौ : पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. आज सोमवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी पिलीभीत येथे झालेल्या या चकमकीत खलिस्तानी कमांडो फोर्सचे तीन दहशतवादी ठार झाले. पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर ग्रेनेड आणि बॉम्ब फेकण्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेत चकमकीत मारले गेलेले दहशतवादी सामील होते. या कारवाईमुळे खलिस्तानी दहशतवाद्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झालेत असे या मोहिमेचे नेतृत्त्व करणारे अधिकारी म्हणाले.


खलिस्तानी दहशतवादी चकमक


पंजाब आणि यूपी पोलिसांची संयुक्त कारवाई:

पीलीभीतमधील चकमकीची ही कारवाई पंजाब आणि यूपी पोलिसांनी संयुक्तपणे केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खलिस्तानी कमांडो फोर्सच्या दहशतवाद्यांना पकडण्याची रणनीती आखली. गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग आणि जसनप्रीत सिंग अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दहशतवादी पंजाब आणि आसपासच्या परिसरात बऱ्याच दिवसांपासून सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले. चकमकीदरम्यान, पोलिसांनी दहशतवाद्यांकडून दोन एके-४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली. यामध्ये दोन एके-४७ रायफल, दोन ग्लॉक पिस्तूल आणि इतर गोळ्यांचा समावेश होता. घटनास्थळावरून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. गुरदासपूरमधील ग्रेनेड हल्ल्यासाठीही या शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


खलिस्तानी दहशतवादी चकमक


गुरदासपूर ग्रेनेड हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार:

१९ डिसेंबर रोजी पंजाबच्या गुरुदासपूरच्या सीमावर्ती भागात बक्षीवाल चौकीवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे या दहशतवाद्यांचा हात होता. खलिस्तान जिंदाबाद फोर्सने सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. जसविंदरसिंग बागी उर्फ ​​मन्नू आगवान हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात समोर आले आहे. गुरुदासपूर हल्ल्यानंतर पोलिसांना फॉरेन्सिक तपासणीत आढळले की ग्रेनेड फेकण्यासाठी ऑटोचा वापर करण्यात आला होता. चौकशीनंतर ऑटो जप्त करण्यात आला. दहशतवाद्यांच्या हालचालींचा मागोवा घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना पिलीभीतमध्ये घेरले. त्यानंतर झालेल्या चकमकीत तिन्ही दहशतवादी मारले गेले.



चकमक सुरू असताना दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवरही गोळीबार केला. पोलिसांच्या गाडीवर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. पोलिसांनीही प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले.

हेही वाचा