गुन्हे वार्ता : सुलेमानला दोन दिवसांपूर्वीच केरळात अटक, आज आणणार गोव्यात

विरोधकांकडून सिद्दीकी प्रकरणाचा चुकीचा वापर, गुन्हेगारांना सोडणार नाही : मुख्यमंत्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
गुन्हे वार्ता : सुलेमानला दोन दिवसांपूर्वीच केरळात अटक, आज आणणार गोव्यात

मडगाव : जमीन हडप प्रकरणातील गुन्हेगार सुलेमान सिद्दीकी याला दोन दिवसांपूर्वीच  केरळ पोलिसांच्या कारवाईनंतर गोवा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्याला आज गोव्यात आणण्यात येईल. त्याच्या चौकशीतून त्याच्या सोबत कोण आहेत, यासह अनेक गोष्टी समोर येतील. विरोधकांकडून या प्रकरणाचा चुकीचा वापर झाला. एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

     मडगावात कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकांना लुटणार्‍या एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, गोमंतकीयांना घाबरण्याची गरज नाही, असा विश्वास व्यक्त केला. लोकांना पोलिसांवर व राज्य सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केलेले होते. सुलेमान सिद्दीकी आपला सगासोयरा असल्यासारखा, त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्यासारखा त्याचा फोटो घेउन फिरणार्‍यांना आता पोलिसांची ताकद कळून आलेली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. 

 सुलेमान सिद्दीकीला केरळ पोलिसांच्या कारवाईनंतर गोवा पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. केरळ पोलिसांकडील कागदोपत्री प्रक्रिया बाकी असल्याने त्याच्या अटकेची माहिती देण्यात आलेली नव्हती. केरळ पोलिसांकडील कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गोवा पोलिसांनी त्याला अटक केलेली असून त्याला आज गोव्यात आणण्यात येणार आहे.

सरकारच्या विरोधात जे जे कोणी बोलले आहेत, ते सर्व त्याच्या चौकशीतून उघड होणार असून लोकांना सुलेमान सिद्दीकीसोबत कोणकोण आहेत, हे कळून येईल. काहीजण तर सुलेमानला सोडावे अशासाठीच फोटो घेउन फिरत होते. सुलेमानचा एक व्हिडिओही व्हायरल झाल्याचे समजलेले आहे. त्यातून विरोधी पक्ष सिद्दीकीचा कसा चुकीचा वापर करत होते, ते दिसून आलेले आहे. गोमंतकीयांना घाबरण्याची गरज नाही. जे लुटारु, जमिनी हडप करणार्‍यांना राज्य सरकार कधीच सोडणार नाही,असेही ते म्हणाले. 

दरम्यान पोलीस अधीक्षक (गुन्हे ) राहुल गुप्ता, उपअधीक्षक राजेश कुमार आणि सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, निनाद देऊलकर, नितीन हळर्णकर आणि गोवा पोलिसांच्या इतर पथकाने केरळ पोलिसांचा मदतीने कारवाई केली 

हेही वाचा