सासष्टी : मडगाव वेस्टर्न बायपास वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


6 hours ago
सासष्टी : मडगाव वेस्टर्न बायपास वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मडगाव : लोकांना व पर्यटकांना पर्यटनाच्या हंगामात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये. यासाठी नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वेस्टर्न बायपासचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. डबल इंजिन सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.




वेस्टर्न बायपासचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई व मडगावचे नगरसेवक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, मडगाव वेस्टर्न बायपास हा सुमारे १२  किमीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी केंद्राकडून २४७ कोटी व राज्य सरकारचा २३५ कोटींचा निधी असा एकूण ४८२ कोटींचा हा प्रकल्प आहे. मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी वेस्टर्न बायपास खुला केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल असे रविवारी म्हटले होते.  त्यानुसार आता २.७५ किमीचा पूर्णत्वास आलेला हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 


 

 राज्यात सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे. राज्यातील विविध उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताह होणार असून लोकांची कामे केली जातील. पायाभूत सुविधा व मानवी विकासावर सरकार लक्ष देत आहे. एमपीटीचा रस्ताही सुरु करण्यात येणार होता पण त्यासाठी केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते एमपीटीचा रस्ता खुला करण्यात आल्यानंतर वास्को शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. मडगाव ते काणकोणपर्यंतच्या महामार्गाच्या कामाला मंजुरी दिलेली आहे. हा रस्ताही पुढील चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल. तसेच उर्वरित रस्त्यांची कामे करुन पुढील पाच वर्षांच्या काळात राज्याच्या सर्व सीमा एकमेकांना रस्त्यांच्या पायाभूत सुविधा पूर्ण करण्यात येतील.


 

मोले ते पणजी, केरी ते पणजी, पत्रादेवी ते काणकोणपर्यंतच्या रस्त्याच्या पायाभूत सुविधा पूर्ण करण्यात येत आहेत. डबल इंजिन सरकारकडून ही कामे लोकांच्या हितासाठी केली जात आहेत, असेही ते म्हणाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील कोणताही प्रकल्प रखडवून ठेवला नाही. आवश्यक ते सर्व प्रकल्प त्यांनी मंजूर करुन देण्यात आलेले आहे. दाबोळी विमानतळाकडील फ्लायओव्हर हा गडकरी यांच्या पुढाकारातून पूर्ण झालेला आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा