मडगाव मार्केटमधील हाणामारीनंतर नाताळच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद
मडगाव : मडगाव एसजीपीडीए मार्केटमध्ये कर्नाटकातून बेकायदेशीर बीफ आणल्याचा दावा करत चौकशीसाठी गेलेल्या गोरक्षकांत व येथील विक्रेत्यांत हाणामारी झाली. यानंतर दोघा विक्रेत्यांना अटक झालेली होती. या प्रकारानंतर राज्यातील बीफ दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ऑल गोवा बीफ विक्रेता संघटनेने घेतला व याचा फटका आता ग्राहकांना बसला आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी येणार्या ग्राहकांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी मडगावातील एसजीपीडीए मार्केटनजीक कर्नाटकातून बेकायदेशीररीत्या बीफ आणल्याबाबत विचारणा केल्यानंतर गोरक्षक व मांस विक्रेत्यांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांवर गुन्हे नोंद झालेले असून मांस विक्रेत्या गटातील दोघांना अटक झाली होती. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यांना जामीनही मंजूर झाला. मात्र, या अटकेनंतर बीफ विक्रेता असोसिएशनची बैठक झाली. यात दोघा विक्रेत्यांना अटक झाल्याचा निषेध करण्यात आला.
मागे मांस विक्रेत्यांनकडून मार्केटमध्ये मांस घेऊन येणाऱ्या गाड्यांना तसेच विक्रीवेळी पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच मांस विक्रेत्यांना मारहाण केली त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी अशीही मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर मांस विक्रेत्यांनी मन्ना बेपारी यांच्या नेतृत्वाखाली आमदार दिगंबर कामत यांची भेट घेत समस्या मांडल्या. या बैठकीवेळी ठोस निर्णय न झाल्याने ऑल गोवा बीफ विक्रेता संघटनेकडून सोमवारी गोव्यातील सर्व बीफची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुन्ना बेपारी यांनी सांगितले होते व सोमवारी बीफची दुकाने उघडण्यात आलेली नाही.
नाताळच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांकडून बीफला मागणी असते, अशावेळी दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याने त्यांना अडचणी भासत आहे. ग्राहक बीफ खरेदीसाठी येत असून रिकाम्या हाती माघारी जात आहेत. राज्य सरकारने ख्रिस्ती बांधवांच्या या सणाच्या पार्श्वभूमीवर मांस विक्रेत्यांच्या प्रश्नावर तत्काळ निर्णय घ्यावा व मांस उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आता वेस्टर्न बायपासच्या उद्घाटनासाठी येत असून त्याठिकाणी मांस विक्रेते पदाधिकारी त्यांची भेट घेणार आहेत.