राज्यातील कॅन्सरग्रस्तांची आयुष इस्पितळांतील उपचारांकडे पाठ!

गतवर्षी एकाही रुग्णाने घेतले नाहीत उपचार; इतर आजारांच्या ४,६४० जणांनी लावली हजेरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 hours ago
राज्यातील कॅन्सरग्रस्तांची आयुष इस्पितळांतील उपचारांकडे पाठ!

पणजी : राज्यातील कॅन्सरने बाधित असलेल्या एकाही रुग्णाने गतवर्षी आयुष इस्पितळात उपचार घेतले नाहीत. तर, इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ४,६४० जणांनी आयुष इस्पितळात जाऊन उपचार घेतल्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आलेले आहे.
कॅन्सरपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही राज्यांतील रुग्ण आयुर्वेदाकडे वळत आहेत. त्यासाठी ते आयुष इस्पितळांमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. गेल्या वर्षभरात राजस्थान, दिल्ली, हरयाणा, कोलकाता, मेघालय, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पुदुच्चेरी या राज्यांतील १४,२५५ कॅन्सर बाधितांनी आयुष इस्पितळांत जाऊन कॅन्सरवर उपचार घेतले. परंतु, गोव्यात मात्र एकाही रुग्णाने आयुष इस्पिळातील उपचारांस प्राधान्य दिले नसल्याचे मंत्री जाधव यांनी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
दरम्यान, गेल्या वर्षभरात गोव्यासह तीस राज्यांतील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या १६,२१,१७८ जणांनी आयुष इस्पितळांत जाऊन उपचार घेतलेले आहेत. त्यात गोव्यातील ४,६४० जणांचा समावेश आहे. यातील ३,५८२ जणांनी आयुर्वेद, ३६० जणांनी होमिओपॅथी, तर ६९८ जणांनी सिद्धाचे उपचार घेतल्याचेही मंत्री जाधव यांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट होते.

हेही वाचा