मद्यधुंद डंपर चालकास पोलिसांनी केली अटक
पुणे : पुण्यात रविवारी रात्री एकच्या सुमारास डंपरने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. त्यापैकी एक अवघ्या एका वर्षाचा तर दुसरा दोन वर्षांचा आहे.
वाघोलीच्या केसनांद फाटा परिसरात हा अपघात झाला. डंपर चालवणारा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार सुमारे १२ लोक फूटपाथवर झोपले होते. सर्व मजूर अमरावती येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . दरम्यान, जानकी दिनेश पवार (२१ ), रिनिशा विनोद पवार (१८ ), रोशन शशदू भोसले (९), नागेश निवृत्ती पवार (२७), दर्शन संजय वैराळ (१८) आणि अलिशा विनोद पवार (४७) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमींना प्रथम आयनॉक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्यांना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले.
हे सर्वजण अमरावतीहून पुण्यात मजुरीच्या कामानिमित्त आले होते. या प्रकरणी डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोत्रे (२६ ) याला ताब्यात घेत अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोनच दिवसांपूर्वी मुंबईत फूटपाथवर खेळणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरड्याचा एसयूव्ही कारखाली चिरडला गेल्याने मृत्यू झाला होता.
२१ डिसेंबर : मुंबईत २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एसयूव्हीने ४ वर्षाच्या मुलाला चिरडले. मुलांचा जागीच मृत्यू झाला. सदर मूल रस्त्याच्या कडेला खेळत होते. आरुष किनवडे असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचे कुटुंब फूटपाथवर राहते. पोलिसांनी १९ वर्षीय एसयूव्ही चालक भूषण संदीप गोळेला अटक केली आहे.
८ डिसेंबर : मुंबईत ८ डिसेंबर रोजी बसने ३० जणांना चिरडले होते, यात ४ जणांचा मृत्यू झाला होता, तर २६ जण जखमी झाले होते. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे हा अपघात झाला. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीला जात होती.
बातमी अपडेट होत आहे.. .