नितीश रेड्डीचे दमदार शतक; भारताचा कमबॅक

बॉर्डर-गावसकर चषक : वॉशिंग्टन सुंदरचे अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
29th December 2024, 12:27 am
नितीश रेड्डीचे दमदार शतक; भारताचा कमबॅक

मेलबर्न : नितीश रेड्डीच्या शतकामुळे मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने कमबॅक केले आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ४७४ धावांचा डाेंगर उभारला होता. भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजयाचा हुरूप वाढला होता. तर प्रत्येक चेंडू टाकताना अहंकार दिसत होता. असे असताना आठव्या स्थानावर आलेल्या नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. १९१ धावांवर सात विकेट गेल्यानंतर सहज सामना खेचून आणू असा ऑस्ट्रेलियाला विश्वास होता. कारण त्यांच्याकडे २८३ धावांची मोठी आघाडी होती. तळाच्या फलंदाजी फार फार किती धावा करू शकतात याचा अंदाज होता. रविंद्र जडेजाची विकेट पडल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला आणि सामना हातून गेल्यातच जमा आहे, असे वाटत होते. पण नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने कमाल केली. दोघांनी सर्वात आधीच टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट टाळले. त्यानंतर एक एक धाव घेत ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ९ गडी गमवून ३५८ धावा केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी नाबाद १०५, तर मोहम्मद सिराज नाबाद २ धावांवर खेळत आहे. खराब प्रकाशामुळे पंचांना सामना लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाकडे अजूनही ११६ धावांची आघाडी आहे. ही आघाडी चौथ्या दिवशी काही धावांनी कमी होऊ शकते. जर या जोडीने आणखी ५० धावांची भागीदारी केली तर ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मनसुबा उधळून निघेल. आता चौथ्या दिवशी हे दोघं फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष आहे. पहिल्या डावात भारातकडून यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यशस्वी जयस्वालने ११८ चेंडूत ८२ धावा करून धावचीत झाला. वॉशिंग्टन सुंदरने १६२ चेंडूत ५० धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डी १७६ चेंडूचा सामना करत नाबाद १०५ धावांवर खेळत आहे.
नितीश कुमराने ११५ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण करत एक मोठा पराक्रम केला. तो ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने ७६ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. नितीशने वयाच्या २१ वर्षे २१६ दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक झळकावण्याचा पराक्रम केला.१९४८ मध्ये ॲडलेडमध्ये वयाच्या २२ व्या वर्षी ४६ दिवसांत कसोटी शतक झळकावणाऱ्या दत्तू फडकरला त्याने मागे टाकले. नितीशपेक्षा वयाने लहान असलेल्या दोनच खेळाडूंनी आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना शतके झळकावली आहेत. या यादीत बांगलादेशचा अबुल हसन (२० वर्षे १०८ दिवस) आणि भारताचा अजय रात्रा (२० वर्षे १५० दिवस) यांची नावे आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला मेलबर्न कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. सध्या भारतीय संघ डब्ल्यूटीसी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच जर मेलबर्न कसोटी सामना अनिर्णित राहिला किंवा भारताचा पराभव झाला, तर टीम इंडिया मालिकेत १-२ ने पिछाडीवर जाईल, यानंतर अखेरचा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवला जाईल. पण चौथ्या कसोटीत पराभव झाला तर भारत डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र ठरण्याची शक्यता बरीच कमी होईल. भारताची टक्केवारी ५५.८८ वरून ५२.७८ वर येईल. तर ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ५८.८९ वरून ६१.४५ पर्यंत वाढ होईल, ज्यामुळे डब्ल्यूटीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचे स्थान आणखी मजबूत होईल.
डब्ल्यूटीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारत मेलबर्नमधील पराभवानंतरही त्याच स्थानावर राहील. मात्र, अशा स्थितीत अंतिम फेरी गाठण्याच्या शक्यतेला मोठा फटका बसणार आहे. डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकण्यासाठी भारताला सिडनीतील अंतिम कसोटी जिंकावी लागेल आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासाठी समीकरण
१. जर भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने जिंकली तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी थेट पात्र ठरेल.
२. जर भारताने ही कसोटी मालिका २-१ ने जिंकली तर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध १ कसोटी सामना ड्रॉ खेळावा लागेल किंवा पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे अशी प्रार्थना भारताला करावी लागेल.
३. जर भारत आणि ऑस्ट्रेलियामधील ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली तर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं पाहिजे आणि पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा मालिकेत २-० ने पराभव केला पाहिजे अशी प्रार्थना टीम इंडिया करेल.
४. जर ही कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली तर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाने १-०ने पराभूत करावं आणि पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा मालिकेत २-० ने पराभव केला पाहिजे असं समीकरण भारतासाठी असेल.
५. जर भारताने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका गमावली तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारे तरुण भारतीय खेळाडू
१८ वर्षे २५६ दिवस : सचिन तेंडुलकर, सिडनी १९९२
२१ वर्षे ९२ दिवस : ऋषभ पंत, सिडनी २०१९
२१ वर्षे २१६ दिवस : नितीश रेड्डी, मेलबर्न २०२४
२२ वर्षे ४६ दिवस : दत्तू फडकर, ॲडलेड १९४८
नितीश कुमार रेड्डीने रचला इतिहास
नितीश कुमार रेड्डीने या मालिकेत इतिहास रचला आहे. नितीश हा या मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.तसेच ऑस्ट्रेलियात एका प्रतिस्पर्धी खेळाडूने षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत ८ षटकार मारणारा रेड्डी पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आता एक षटकार मारल्यानंतर रेड्डी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम करेल. या संपूर्ण बॉर्डर गावस्कर मालिकेत नितीश कुमार रेड्डीने आपल्या फलंदाजीने सगळ्यांनाच प्रभावित केले आहे. रेड्डी यांनी ४१, ३८*, ४२, ४२, १६ आणि आता १०५ नाबाद धावा खेळल्या आहेत. या संपूर्ण मालिकेत नितीश कुमार रेड्डीने भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महान शतक : गावसकर
खेळ संपल्यानंतर सुनील गावस्कर म्हणाले, हे त्याचे पहिले शतक आहे आणि नजीकच्या भविष्यात तो अनेक शतके करेल. मला आशा आहे की भविष्यात तो अशाच धावा करताना दिसेल. तो भारतीय क्रिकेटचा नवा स्टार आहे. जर तो स्वत:शी प्रामाणिक राहिला तर भारताच्या या २१ वर्षीय ऑलराउंडरचे भविष्य उज्जवल आहे. नितीश भारतीय क्रिकेटमुळे इथे आहे आणि त्याने भारतीय क्रिकेटला हलक्यात घेऊ नये. नितीश कुमार रेड्डीचे हे शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान शतकांपैकी एक आहे, असे गावस्कर म्हणाले.

नितीशच्या कुटुंबासोबत रवी शास्त्रीही भावूक
नितीश रेड्डीने मेलबर्न येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. नितीशने शतक झळकावल्यानंतर त्याचे वडील खूप भावूक झाले होते. हे पाहून प्रत्येक भारतीयाचे डोळे पाणावले. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. कॉमेंट्री बॉक्समधील त्यांचा एक फोटो समोर आला, ज्यामध्ये त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. नितीश रेड्डी याच्या शतकानंतर कुटुंबीयांनी त्याची भेट घेतली. यावेळी सर्वांचे डोळे ओलावले होते. बीसीसीआयने नितीश रेड्डी याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबाला भेटत आहे. हॉटेलच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर तो प्रथम त्याच्या आईला भेटतो. नितीशला पाहताच त्याची आई आनंदानं त्याच्या गालाचं चुंबन घेते. यानंतर तो आपल्या बहिणीला मिठी मारतो. रेड्डी याच्या वडिलांनाही आपले अश्रू आवरता येत नाहीत आणि ते आपल्या मुलाच्या खांद्यावर डोके ठेवून भावूक होतात.