पणजी : कळंगूट समुद्रात काल जलसफरीदरम्यान झालेल्या बोट अपघाताला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून बोट ऑपरेटर धारेप्पा झिराली (४२, बेळगाव) आणि इब्राहीमसाब (३४, शिमोगा) यांना पणजी किनारी पोलिसांनी अटक केली. बोट मालक मीना कुतिन्हो हिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काल दुपारी कळंगूट येथे पर्यटकांना समुद्रात जलसफरीवर घेऊन गेलेली बोट उलटली. दुर्घटनेत सुर्यकांत पोफळकर (४५, रा. खेड रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. तर त्यांच्या पाच वर्षीय मुलासह पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोवा वैद्यकिय इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खेड- महाराष्ट्रातील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर या कुटूंबांमधील १३ जण गोव्यात नाताळच्या सुट्टी निमित्त आले होते.
बोट समुद्रात उतरली आणि सुमारे शंभर मीटर अंतरावर या बोटचे इंजिन वाळूत रुतून पडले आणि इंजिन बंद पडले. त्याचवेळी समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. तत्पुर्वी बोटने या ठिकाणी एक गोलाकार फेरी मारली होती व दुसरी फेरी मारतेवेळी ही दुर्घटना घडली.
वॉटर स्पोटर्स जलसफरीवेळी सुरक्षतेच्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी नेहमीच घेतली जाते. ही घटना दुर्दैवी असून बोटचे इंजिन वाळूत रूतल्याने बोट वळली व इंजिन अचानक बंद पडले. त्याचवेळी मोठी लाट आली आणि बोटला धडकली. त्यामुळे बोट पाण्यात कलंडली. सर्वांना लाईफ जॅकेट दिली होती. ही घटना घडताच आमचे इतर क्रू कर्मचार्यांनी पाण्यात धाव घेत सर्वांना बाहेर काढले. असे काल बोटमालक अँथनी कुतिन्हो यांनी दुर्घटनेनंतर सागितले होते.