दोघांचा रस्ते अपघातात तर दोघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू. एकट्याचा गोळी लागून मृत्यू
पणजी : नाताळ हा आनंदाचा सण आहे, पण काल बुधवार हा घातवार ठरला. काल राज्यभरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत ४ जणांनी आपला जीव गमावला. तर धारबांदोडा झालेल्या अपघातात भरधाव ट्रेलरने रस्त्याबाजुला उभे असलेल्या दोन ट्रकांना धडक देत येथीलच एका घराला धडक दिली. सुदैवाने जीवितहानी टळली.
सत्तरी तालुक्यातील पाटवळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील जंगलात रानटी जनावरांच्या शिकारीसाठी गेलेल्या एकाला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. समद खान ( नानूस-सत्तरी )असे या व्यक्तीचे नाव आहे.
सद्यघडीस समोर आलेल्या माहितीनुसार, तिघे जण रानटी जनावरांच्या शिकारीसाठी येथील जंगलात गेले होते. येथेच समद खान यांना गोली लागली व ते मरण पावले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले व त्यांनी समद खान यांच्या सोबत असलेल्या अन्य दोघांना ताब्यात घेतले. समद खान यांना गोळी नेमकी कशी लागली याचा उलगडा होत नसल्याने सदर ठिकाणी फॉरेन्सिक पथकास देखील पाचारण करण्यात आले. दरम्यान शिकारीला गेलेल्या समद खानच्या मृत्यू प्रकरणी नाणूस येथील बाबू सांगार आणि गौस अहमद पटेल यांना वाळपई पोलिसांनी अटक केली. शिकारीला गेलेल्या समदचा गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला होता.
भाटी-गोवा वेल्हा येथे कारची एका घराच्या संरक्षण भिंतीला धडक बसल्याने झालेल्या स्वयं अपघातात फ्रान्सिस ब्राझांका (४३, फोर्गोटेवाडो, गोवा वेल्हा) या कार चालकाचा मृत्यू झाला. तर दामोदर आर्लेकर (रा. गोवा वेल्हा) हा सहप्रवासी किरकोळ जखमी झाला. हे दोघे नाताळ सणानिमित्त आयोजित मित्रांच्या पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीतून ते पहाटे घरी चालले होते. वाटेत फ्रान्सिस याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारची धडक रस्त्याच्या बाजूच्या एका घराच्या संरक्षण भिंतीला बसली.
बुधवार, सकाळी ८:३० वाजता
केपे तालुक्यातील पारोडा येथे एका अपघातात शिरवई-केपे येथील रोशन मुजावर (४१) यांचा मृत्यू झाला. मुजावर हे आपल्या जीए-०९-७९८० या दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या सरफराज मोहम्मद याच्या जीए-एपी-११६५ या दुचाकीसोबत धडक झाली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना एका दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक बसली व हा अपघात घडला.
बुधवार, दुपारी ११ ते १२:३० च्या सुमारास
कळंगूट येथे पर्यटकांना समुद्रात जलसफरीवर घेऊन गेलेली बोट उलटली. दुर्घटनेत सुर्यकांत पोफळकर (४५, रा. खेड रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. तर त्यांच्या पाच वर्षीय मुलासह पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोवा वैद्यकिय इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खेड- महाराष्ट्रातील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर या कुटूंबांमधील १३ जण गोव्यात नाताळच्या सुट्टी निमित्त आले होते.
बोट समुद्रात उतरली आणि सुमारे शंभर मीटर अंतरावर या बोटचे इंजिन वाळूत रुतून पडले आणि इंजिन बंद पडले. त्याचवेळी समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. तत्पुर्वी बोटने या ठिकाणी एक गोलाकार फेरी मारली होती व दुसरी फेरी मारतेवेळी ही दुर्घटना घडली.
बुधवार, दुपारी ३ च्या सुमारास
सावईवेरे येथील अनंत देवस्थानच्या तळीत बुडाल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. तुळशीदास दत्ता पालकर (सावईवेरे) असे या युवकाचे नाव आहे. येथील तळीत हा युवक मुलांना पोहायला शिकवायचा. नेहमीप्रमाणेच तळ्यात उतरून येथे जमलेल्या मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देत असताना तो अचानक पाण्यात बुडाला.
येथे उपस्थित असलेल्या लोकांनी धाव घेत त्यास पाण्यातून बाहेर काढले असता त्याची प्राणज्योत मावळल्याचे समोर आले. दरम्यान पाण्यात पोहत असताना त्यास हृदयविकाराचा झटका आला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय ? याचा उलगडा शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येईल.